कृषी

कृषि विज्ञान संकुल भविष्यात चार जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक होणारा प्रकल्प – ना. दादाजी भुसे

राहुरी विद्यापीठ : कोरोनाच्या अतिशय कठीण कालावधीमध्ये अथक परीश्रमातून कृषि विज्ञान संकुलाची सन २०२०-२१ साली सुरुवात करण्यात आली. संकुलाअंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, कृषी तंत्रनिकेतन, कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे एकाच वेळी मान्यता मिळालेले देश पातळीवरील एकमेव संकुल आहे. मालेगाव व पंचक्रोशीच्या विकासासाठी हा अभिनव प्रकल्प असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांनी केले.

कृषि विज्ञान संकुल काष्टी, मालेगाव येथे दि. १६ जुलै रोजी ना. भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, कृषि विज्ञान संकुल हा प्रकल्प म्हणजे मालेगावची कृषि पंढरी म्हणून उदयास येत आहे. अतिशय दिव्य दृष्टीने साकारण्यात येणारा हा प्रकल्प नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भुसे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास येत आहे ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे.

यावेळी कृषि विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ.सचिन नांदगुडे यांनी कृषि विज्ञान संकुलामध्ये सुरु असलेल्या सर्व कामांचे सादरीकरण करत सद्यस्थितीच्या प्रगतीवर दृष्टीक्षेप टाकला. या बैठकीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, डॉ. एस.पी. सोनवणे व इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button