अहमदनगर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त “सामाजिक न्याय दिन संमेलन” सप्ताहाचा समारोप कार्यक्रम संपन्न

राहुरी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती “सामाजिक न्याय दिन” म्हणून २६ जून म्हणून संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. यावर्षी १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत “सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह” म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

सदर उपक्रम अहमदनगर जिल्हात सहा. आयुक्त समाजकल्याण कार्यालय तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत “समतादूत प्रकल्प” अहमदनगर जिल्हा यांचे माध्यमातून मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

बार्टी मुख्यालय, पुणे तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय अहमदनगर यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाअंतर्गत अहमदनगर जिल्हात संपूर्ण आठवडाभर समतादूत प्रकल्प मार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासह भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, थोर महापुरुषांच्या विचारांवर आधारित प्रबोधन कार्यक्रम व विविध स्पर्धांचे जिल्हा व तालुका पातळीवर आयोजन करण्यात आले होते.

“सामाजिक न्याय दिन संमेलन सप्ताह” या उपक्रमाचा सेवा नर्सिंग महाविद्यालय श्रीरामपुर या ठिकाणी समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून सुगी फाऊंडेशनचे संदिप कोकाटे हे लाभले होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, सेवा नर्सिंग महाविद्यालयचे संचालक ज्ञानदेव आहेर, प्राचार्य रवि विखे, मनोज मुसमाडे, संदेश शिरसाठ, चेतन मापारी, निखील खराडे, कोमल मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला मुख्य व्याख्याते म्हणून लाभलेले संदिप कोकाटे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जिवनकार्यावर आधारीत विस्तृत असे व्याख्यान दिले. प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांनी बार्टी मार्फत राबविण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम बाबत उपस्थितींना विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी भारतीय संविधान उद्देशिका व बार्टी प्रकाशन विभागाची पुस्तके तसेच सामाजिक न्याय विभागाची माहिती पत्रके उपस्थितांना वितरित करण्यात आली.

सदर सप्ताहात विविध कार्यक्रम चे आयोजन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अहमदनगर चे राधाकिसन देवढे यांच्या सहकार्याने बार्टी, पुणे समतादूत प्रकल्प – अहमदनगर जिल्हाच्या माध्यमातून समतादूत पिरजादे एजाज, रजत अवसक, संतोष शिंदे, रवी कटके, वसंत बढे, सुलतान सय्यद यांनी जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन केले होते. समारोपीय कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राहुरी तालुका समतादूत पिरजादे एजाज तसेच आभार महाविद्यालय चे सहाय्यक प्राध्यापक संदेश शिरसाठ यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button