ठळक बातम्या

दुधातील भेसळ थांबल्यास दुधाला प्रति लिटर 50 रुपये भाव मिळेल – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी | जावेद शेख : ‘जखम डोक्याला व मलम गुढग्याला’ याप्रमाणे राजकीय नेते गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनात दूध भेसळीबाबत काहीच बोलले नाही. कृत्रिम दुध व दुधातील भेसळ थांबल्यास दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव सहज मिळू शकेल, असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी व्यक्त केले आहे.

सध्या कांद्याला 3 हजारांपर्यत भाव मिळत आहे, सत्ताधारी पक्षाने चालु अधिवेशनात दुध दर व अनुदान जाहीर करुन नविन योजना सुरू केली, तरीही आंदोलने… महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी वर्ग कोरोना, अतिवृष्टी या कारणाने आर्थीक अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा विद्युत पुरवठा खंडीत करुन थकबाकीच्या नावाखाली सक्तीची विजबील वसुली करण्यात आली. आता मात्र शेतमालाच्या भावाबाबत आंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे कुठलेही देणेघेणे नसून निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा फक्त शेतकऱ्यांच्या मतासाठी राजकीय स्टंट आहे. अशा प्रस्थापित राजकीय मंडळींच्याच नाकर्तेपणामुळेच शेतीधंदा धोक्यात आला असल्याचा आरोप सुरेशराव लांबे यांनी केला आहे.

पुढे बोलताना सुरेशराव लांबे म्हणाले की, अनेक वर्षांपासुन शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळाला. मात्र, या व्यावसायालाही दूध भेसळ करणाऱ्या महाभागांची दृष्ट लागली. काही बड्या नेतेमंडळीच्या आशिर्वादाने अनेक दुध भेसळखोरांकडून स्व:हितासाठी मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ करून निष्पाप नागरिकांसह लहान लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणले जात असताना यात खरा दूध उत्पादक नाहकच बदनाम होत आहे. या दूध तस्करांवर सरकारने व अन्न व औषध भेसळ विभागाने कठोर कारवाई केल्यास दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 50 रुपयांपर्यत भाव मिळेल व आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही, असा सुचक सल्ला सत्ताधारी पक्षासह विरोधकांना शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button