संत तेरेजा बॉईज हायस्कुल येथे नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तके वितरण
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : संत तेरेजा प्राथमिक शाळा, संत तेरेजा बाॅईज हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय हरेगाव येथे शासकीय नियमानुसार विविध प्रकारचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात प्रथमदिनी साजरे करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या डोक्यावर विविध रंगांच्या टोप्या घालून त्यांना गुलाबपुष्प व खाऊ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे सचिव रे.फा.डाॅमानिक रोझारिओ, संस्थेचे सहसचिव रे.फा. फ्रॉन्सिस ओहोळ, हरेगाव धर्मग्रामाचे सहाय्यक धर्मगुरू रे.फा.संतान रॉड्रीग्ज हे मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशानुसार मोफत पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच हरेगाव धर्मग्रामासाठी लाभलेले नविन धर्मगुरू रे.फा. फ्रॉन्सिस ओहोळ, रे.फा. संतान रॉड्रीग्ज यांचे देखील स्वागत व सत्कार करण्यात आले. संत तेरेजा बाॅईज हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्यपदी बलमे जे.एस. यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचाही सत्कार व स्वागत करण्यात आले.
तसेच संत तेरेजा शैक्षणिक संकुलातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बुके व पेन साहित्य देवून करण्यात आला. यात इयत्ता बारावी कला शाखेत कु.अंजली सरोदे, सायन्स शाखेत कु.रिया साळवे व दहावीमध्ये प्रतिक पंडीत आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चद्रकांत चित्ते यांनी सूत्र संचालन केले. यावेळी संत तेरेजा संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक बलमे यांनी आभार मानले.