पेन्शन वाढीबरोबर शेती महामंडळ कामगारांना घरकुलासाठी दोन गुंठे जागा द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा व इपीएस पेन्शनधारकांना पेन्शन वाढीसाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
यावेळी सविस्तर चर्चा करून खंडकरी यांना जमीन वाटप करताना राज्य शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले व त्यात कामगारांना दोन गुंठे जागा व घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु २५ वर्षे झाल्यानंतरही राज्य शासनाने दोन गुंठे जागा व घरे बांधून देण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर सन २००९ यावर्षी राज्य शासनाने शेती महामंडळ कामगार संघटनांशी चर्चा करून १४३ कोटी थकीत देय रक्कम ठरविली.
त्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री यांनी तडजोड करून कामगारांना २००८ ते २०१२ वर्षापर्यंतचा बोनस, ग्राच्युटी, बोनस, ४ था, पाचवा वेतन आयोग फरक रक्कम, सहावा वेतन आयोग देण्यासंबंधी कार्यकारी संचालक यांनी राज्य शासनाकडे २०१५ यावर्षी प्रस्ताव पाठविला. तो अद्याप मंजूर केला नाही. ९९ कोटी ५० लाख रु देण्याचा निर्णय केला. त्याची सुद्धा अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही. त्यासाठी नुकताच मार्चमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे राज्यातील ३ हजार कामगारांचा मोर्चा नेण्यात आला होता. तसेच महामंडळ कामगारांना १० वर्षापासून पेन्शनवाढ करण्यात आली नसल्याने पेन्शनवाढ व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना यांनी केली. यासाठी अनेक आंदोलने केली, आदी विषयांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले.
या शिष्टमंडळात कामगार नेते सुभाष कुलकर्णी, वेनुनाथ बोळींज, चांगदेव गायकवाड, पत्रकार बी.आर. चेडे, प्रकाश ठाकरे, बाबूलाल पठाण, रमेश देसाई, संतोष आहिरे, कारभारी बत्तीशे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.