अहिल्यानगर

राज्यातील शेती महामंडळ कामगारांचा शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कामगारांना राहण्यासाठी २ गुंठे जागा, थकीत देय तसेच विनामुल्य जमीन वाटप बंद करा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महाराष्ट्र राज्यातील आठ मळ्यावरील ३ हजार महिला पुरुष कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा, थकीत देय, संयुक्त शेतीमुळे ६ हजार रोजंदार कामगार बेरोजगार झाले त्यांना काम तसेच विनामूल्य जमीन वाटप बंद करावे, आदी मागण्यांसाठी सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाची सुरुवात शिर्डी बस स्थानक, शहरातून घोषणा देत शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यात आला. हजारो कर्मचारी उन्हात बसून बराच वेळ प्रमुख नेत्यांची भाषणे ऐकत होती. सुभाष कुलकर्णी, वेनुनाथ बोळीज, भालचंद्र शिंदे, भिकन शिंदे, बाबासाहेब बोर्डे, चिंचवडकर, महेंद्र साळवे आदींसह महिलांनी भाषणे केली.

यात प्रामुख्याने राहण्यासाठी दोन गुंठे जागा मिळावी, माजी महसूल मंत्री पतंगराव कदम यांच्या झालेल्या तडजोडी प्रमाणे कामगारांची थकीत देय रक्कम रु. ९९ कोटी ५० लाख मिळावी, ६ वा वेतन आयोग लागू करावा, विनामुल्य जमीन वाटप बंद करावे, शिर्डी एमआयडीसी मध्ये विनामुल्य जागा घेऊन कामगारांना अथवा वारसांना काम द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब कोळेकर यांना देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून आजच्या आज राज्य सरकारकडे निवेदन पाठवून तुमच्या मागण्यांसंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.

इपीएस पेन्शन धारकांना दहा वर्षांपासून पेन्शन वाढ झाली नसून त्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. आचारसंहिता लागण्यापूर्वी पेन्शन धारकांना पेन्शन वाढ मिळावी ही मागणी करण्यात आली.

यावेळी पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक टिळे, एपीआय कादरी, पो.हे.कॉ खेडकर, पो.कॉ.घुले, गरदास आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button