अहिल्यानगर

शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील – लांबे पाटील

मुख्यमंत्री वायोश्री योजने अंतर्गत ६५ वर्ष वय पूर्ण असणाऱ्या नागरिकांना मिळणार ३ हजार रुपयांचा लाभ

राहुरी : महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे ‘गाव तिथे विकास, घर तिथे योजना’ या योजने अंतर्गत शासकीय योजनांची अमलबजावणी केली जात आहे.

नुकतेच राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत ६५ वर्ष वय असणाऱ्या व्यक्तींना ३ हजार रुपयांचा लाभ देवून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सहाय्य करण्यात येणार आहे. राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानाप्रमाणे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स व स्वयंम घोषणापत्र, २ फोटो लागणार आहेत. योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. अधिक माहिती साठी महेंद्र शेळके ९५१८७६००६२, योगेश आढाव ८४०८८७७२९६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय राहुरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यात शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डी लोकसभेचे जलदूत खा.सदाशिव लोखंडे, नगर दक्षिणचे खा.सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा.आ. शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील शिवसैनिक, शिवदूत, महिला आघाडी काम करत आहे. शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील म्हणाले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button