श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी आ. कानडेंनी अधिवेशनात प्रश्न मांडावा- लांडगे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – बावीस नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी शासन विचारधीन आहे. प्रभू श्रीरामाचे वास्तव्याने श्रीरामपूर नजीक गोदाकाठ परिसर पुनीत झालेला आहे. नुकत्याच अयोध्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठामुळे आनंदाचे वातावरण आहे. योगायोगाने उद्यापासून राज्याचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात शासनाने तशी आर्थिक तरतूद करुन येत्या श्रीराम नवमी निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्रांचे नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा निकषांच्या आधारे होण्यासाठी आमदार लहुजी कानडे यांनी प्रश्न मांडण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी निवेदन दिले आहे.
अशोकनगर फाटा येथील इच्छामणी मंगल कार्यालयात दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन प्रसंगी आ. कानडे यांना राजेंद्र लांडगे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, अनिस पठाण उपस्थित होते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महसूलमंत्री यांनाही भेटणार आहोत. या अधिवेशनात तरी शासन जिल्हा विभाजन विधेयक निश्चितच एकमताने मंजूर करेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. श्रीरामपूर जिल्हा झाल्यास नवनवीन उद्योग धंदे वाढीस मदत होईल. शिवाय सर्व सामान्य नागरिकांचे क्रयशक्तीत वाढ होणार आहे. येत्या श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा जाहीर झाल्यास तो ऐतिहासिक निर्णय होईल असे लांडगे म्हणाले आहे.
खरंतर श्रीरामपूर जिल्हा हा प्रतिष्ठेचा आणि भावनिक होत चालला आहे. साठ हजार वर्ष अहिल्या शिळा होऊन पडली होती. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या शापमुक्त झाली. तसे देशातील प्रभू श्रीरामाच्या नावाने पावन झालेले एकमेव श्रीरामपूर शहर शाप मुक्त होण्यासाठी संघर्ष समितीने तीन महिन्यापूर्वी श्रीरामालाच साकडे घातले. त्याच बरोबर अयोध्या प्रभु श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्तानेही पहिल्या टप्प्यात २२,२२२ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने दुसऱ्या टप्प्यात १९,११९ वेळेस श्रीराम तारक मंत्र नामजपाने श्रीरामपूर जिल्हा होण्यास अनुकूलता निर्माण होत आहे. प्रभू श्रीरामात श्रीरामपूर जिल्हा करण्याची अदृश्य शक्ती आहे, यावर आपला विश्वास आहे. येत्या १७ एप्रिलला होणाऱ्या श्रीराम नवमी निमित्ताने श्रीरामपूर जिल्हा शंभर टक्के होईल असा विश्वास राजेंद्र लांडगे यांनी शेवटी बोलून दाखविला.