नाशिक पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मधूनच जाण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंनी पुढाकार घ्यावा – इंजि. कानवडे
संगमनेर : नाशिक येथे एका विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा प्रकल्प आता 30 किमी अंतर वाढवून शिर्डी मार्गे पुणे करावयाचा आहे, तशी अंतिम मंजुरीही येणार असल्याचे बोलल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून हा रेल्वे मार्ग संगमनेर मधूनच जाण्यासाठी संगमनेर येथील स्वराज्य संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष इंजि. आशिष कानवडे यांनी नुकतेच छत्रपती संभाजीराजे यांना पत्र लिहून हा रेल्वे मार्ग संगमनेर मधूनच जाण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.
सदर पत्रात इंजि. कानवडे यांनी म्हटले आहे की, छत्रपती संभाजीराजे हे राज्याच्या विकासासाठी गाव आणि शहरे जोडली जावी यासाठी अनेक प्रकल्प यावेत यासाठी आग्रही आहेत. उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प नाशिक- पुणे रेल्वे हा होत आहे. त्यासाठी भूसंपादन हे 2020 पासून सुरू आहे. सिन्नर, संगमनेर मध्ये भूसंपादन झाले असून प्रकल्प याच मार्गे होणे गरजेचे आहे. नाशिक येथे एका विकास कामांचे उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आता 30 किमी अंतर वाढवून शिर्डी मार्गे पुणे करावयाचा आहे, तशी अंतिम मंजुरी ही येणार असल्याचे सांगितले.
सदर रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर असा झाल्यास सिन्नर, संगमनेर व अकोले या ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेस मोठा हातभार लागणार असून दळवळणासाठी सोयीस्कर ठरणार आहे. या भागातील अनेक उच्च शिक्षित तरुण आज बेरोजगार आहे. हा रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे गेल्यास या भागासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. तरी सदर प्रकरणात छत्रपती संभाजीराजेंनी वैयक्तिक रेल्वे मंत्रालय भारत सरकार महारेल यांच्याशी चर्चा करून सदर रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे न जाता सिन्नर, संगमनेर या मार्गे नेऊन संगमनेर, अकोले पठार भागाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे. तसेच वेळ पडल्यास आपल्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून जनआंदोलन उभे करण्यास देखील तयार असल्याचे म्हटले आहे.