हरेगाव शाळेचा ५७ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : बेलापूर कंपनी हायस्कूल हरेगावच्या १९६७ या वर्षीच्या एसएससी ग्रुप विद्यार्थ्यांनी तब्बल ५७ वर्षांनी हॉटेल ऋतुगंध पुणे येथील सभागृहात ४ फेब्रुवारी रोजी स्नेहमेळावा आयोजित केला होता. तो जुन्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाला.
बालपणी शाळेत रमणारे जिवलग मित्र मैत्रिणी एव्हढ्या वर्षानंतर एखाद्या स्वप्नासारखे भेटतात. कोणाला सुना आलेल्या, कोणी आजोबा आजी झालेले, कोणी सासू सासरे अगदी ओळखू न येण्याइतके बदल झालेला असा हा अविस्मरणीय सोहळा रंगला. स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन ज्योती काळे यांनी केले व त्यांचे सहकारी यांनी सूत्रबद्ध नियोजन केले होते. सकाळी १० वाजल्यापासून त्यांची पाउले येण्यास सुरुवात झाली. रंगदार आठवणी, अनुभव, मिळालेले प्रेम, एकमेकाबद्दलची आपुलकीची मैत्री आणि बरेच काही खुमासदार शैलीत अनेकांनी सांगितले. एकमेकांना मदत करणे हे सुद्धा या ग्रुपने केले.
रावसाहेब आदिक, नीलकंठ गायकवाड, विजय गंधे, भागवत मुठे, सखाराम डिके, उत्तम राजगुडे, श्रीराम कुलकर्णी आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शुभांगी जोशी, अंजली कुलकर्णी आदींनी कविता सादर केल्या. सुचेता कुलकर्णी यांच्या सुरेल गाण्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा स्वाद गप्पा मारता मारता घेतला. समारोप प्रसंगी सर्वांनी चहा घेऊन आठवणींचा सुगंध साठवून ठेवण्यासाठी आपापल्या घरी परतले. या आठवणी बाबासाहेब चेडे यांनी छायाचित्रणाने टिपल्या. आभार प्रदर्शन श्रीराम कुलकर्णी यांनी केले.