नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांचा नागरिकांकडून सत्कार
राहुरी – नगर ते शिर्डी रस्ता दुरुस्तीसाठी नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने वेळोवेळी आवाज उठवत आंदोलन करून प्रशासनास रस्ता दुरुस्त करण्यासाठी पाठपुरवा केला. या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल येवले आखाडा व जोगेश्वरी आखाडा येथील व्यावसायिक व नागरिकांनी कृती समितीच्या सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम काका हॉटेल येथे आयोजित केला होतो.
यावेळी प्रास्ताविक करताना ढोकणे म्हणाले की, रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या लढ्यामुळे नगर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. जोगेश्वरी आखाडा, येवले आखाडा परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाले आहेत, अपघातात अनेक प्रवाशांचे मृत्यू देखील झालेले आहेत. रस्ता दुरुस्ती कृती समितीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
या प्रसंगी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे वसंत कदम म्हणाले की, राहता, कोल्हार, राहुरी परिसरातील अनेक युवक रोजगारासाठी नगर येथे रोज नगर शिर्डी रस्त्यावरून प्रवास करतात. प्रवासादरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात होवून अनेक तरुणांचे अपघात होवून प्राण गेलेले आहेत. याची दखल घेत २०१९ सालापासून रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून कृती समितीची स्थापना करून अनेक आंदोलने करण्यात आली.
या प्रसंगी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले कि, नागरी सत्कारामुळे रस्ता दुरुस्ती कृती समितीची जबाबदारी आणखी वाढली आहे. रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून आंदोलन करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. परंतु कृती समितीच्या सदस्यांचा व नागरिकांच्या पाठबळामुळे लढण्याचे बळ मिळाले. नगर दक्षिणचे खा.सुजय विखे व शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या सहकार्यामुळे कृती समितीच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या प्रसंगी सुनील विश्वासराव, संतोष चोळके, अभिजित आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार किशोर गोसावी यांनी मानले.
या कार्यक्रमास हसन सय्यद, सतीश घुले, मनोज कदम, मनोज गावडे, श्रीकांत शर्मा, प्रमोद विधाटे, सचिन कदम, नितीन मोरे, प्रसाद कदम, बाबासाहेब खांदे, अशोक तनपुरे, राहुल गोसावी, महेंद्र शेळके, काका बिडवे, रंगनाथ येवले, महेश बनकर, किशोर बेलन, सचिन जाधव, आदेश जाधव, अमोल धनवटे, दत्तात्रय धनवटे आदींसह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.