शिरसगावला वेळोवेळी पूर्ण सहकार्य राहील – पो.नि.नितीन देशमुख
पोलीस निरीक्षक देशमुख यांची शिरसगाव तंटामुक्ती बैठकीस उपस्थिती
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे नुकतीच महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची पहिलीच बैठक नव्याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच अशोकराव पवार व उपाध्यक्षपदी अशोकराव गवारे यांची निवड झाली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचा शिरसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. देशमुख यांच्या हस्ते तंटामुक्ती समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेशराव मुदगुले यांनी मागील आढावा सांगितला व गाव तंटामुक्त करून पारितोषिक मिळविलेले आहे. यापुढे काही वाद निर्माण झाल्यास ते श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला न जाता गावातच मिटविले जातील अशी ग्वाही दिली. या कामी पोलीस विभागाने सहकार्य करावे असे सुचविले. सत्काराला उत्तर देताना पो.नि.नितीन देशमुख म्हणाले की, ग्रामस्थांनी मला निमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून शिरसगावला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गणेशराव मुदगुले, माजी तहसीलदार गुलाबराव पादीर, गटविकास अधिकारी शामराव पूरनाळे, सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रामसेवक पी डी दर्शने, सर्व ग्रा.प.सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.