डॉ नवले यांची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या पदावर निवड
राहुरी : दि. 27 डिसेंबर 2023 रोजी घोषित झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक 16/2022 च्या निकालामध्ये राहुरी तालुक्यातील तालुका लघु पशूसर्व चिकित्सालय येथे कार्यरत असणारे पशुधन विकास अधिकारी डॉ. शितल लक्ष्मण नवले यांची सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन गट अ या पदावर निवड झाली आहे.
ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एखतपुर गावचे रहिवासी असून ते राहुरी याठिकाणी गेले 3 वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी गट अ या पदावर कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे त्यांच्या मूळ गावी सांगोला तालुका या ठिकाणी झाले तर 12 वी नंतर होणाऱ्या CET मध्ये भरघोस यश मिळवून व तालूक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन श्री. नवले यांनी त्यांचे B.V.Sc & AH हे पशू वैद्यकीय क्षेत्रातील पदवीचे शिक्षण तसेच M.V.Sc ( Surgery and Radiology) हे पदव्यूत्तर शिक्षण शासकीय महाविद्यालय, मुंबई या ठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर 2014 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवून पशुधन विकास अधिकारी या पदावर पशू वैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 लासलगाव, जि. नाशिक या ठिकाणी पदस्थापना मिळाली व त्यानंतर ऑगस्ट 2020 पासून ते राहुरी या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशू सर्व चिकित्सालय या ठिकाणी कार्यरत आहेत.
राहुरी या ठिकाणी काम करत असताना देखील त्यांनी त्यांचे मनमिळावू व कामाच्या बाबतीत तत्पर स्वभावामुळे पशू पालकांची मने जिंकली. संपूर्ण महाराष्ट्रात लंपी रोगाचा प्रादुर्भाव असताना देखील मागील वर्षी डॉ नवले यांनी कार्यक्षेत्रात रोग नियंत्रणाचे कामकाज व नियोजन अतिशय चांगल्या प्रकारे केले होते. त्यांचा हा शालेय विद्यार्थी ते पशूधन विकास अधिकारी व त्यानंतर आता सहाय्यक आयुक्त पशूसंवर्धन या पदावर स्पर्धा परिक्षेमधून निवड हा प्रवास त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कष्टाळू पणाची चुणूक दाखवून जातो. डॉ शितल लक्ष्मण नवले हे राहुरी तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार श्रीमती पूनम दंडिले मॅडम यांचे यजमान आहेत.