सम्राट अशोक कमानीस डॉ. आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक सहकार्य करावे – अशोकराव जाधव
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राजा सम्राट अशोक कमानीस डॉ. आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक सहकार्य करावे व १६ डिसेंबर २०२४ पर्यंत कमानीचे बांधकाम पूर्ण करून महार वतन परिषद क्रांती स्तंभाचेही काम सुरू राहील असे कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी स्वाभिमान दिनी प्रतिपादन केले.
महाराष्ट्र राज्य बौद्ध विहार विकास समिती अंतर्गत हरेगाव बौद्ध विहार समिती व ट्रस्ट यांच्या वतीने १६ डिसेंबर रोजी महार वतन परिषद, स्मृती व उजाळा कार्यक्रम हरेगाव स्वाभिमान समता भूमी दिन निमित्ताने हरेगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी राजा सम्राट अशोक कमानीची पायाभरणी समारंभ डॉ. शिवाजीराव पंडित यांचे हस्ते तसेच महार वतन परिषद स्मृती क्रांती स्तंभ पायाभरणी समारंभ माजी सरपंच पी एस निकम यांचे हस्ते व अशोकराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
बुद्ध विहार बांधकामासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल दिवंगत बुद्ध विहार सदस्य यांचे कुटुंबियांचा सत्कार, बेलापूर शुगरचे जेष्ठ कामगार, ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी व प्रा.बाळासाहेब सातुरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.शिवाजीराव पंडित, संचालक अशोकराव जाधव, प्रा.सातुरे, प्रा.किरण खाजेकर, सुनील शिणगारे, अशोक बागुल आदींनी मनोगत व्यक्त करून या दिनाचे महत्व सांगितले व यापुढे भव्य असा राष्ट्रीय कार्यक्रम घेण्यात येईल. या कार्यक्रमाबरोबरच राजा सम्राट अशोक कमान व स्मृती क्रांती स्तंभासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले.
१६ डिसेंबर १९३९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हरेगावात महार वतन परिषद घेतली होती व सटवाजी शेळके ठेकेदार यांचेकडे मुक्काम केला होता. त्या स्मृती दिनास उजाळा म्हणून दरवर्षी बुद्ध विहार, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे स्वाभिमान दिन साजरा करण्यात येतो. बौद्ध महासभेचे वतीनेही कार्यक्रम स्मारकाजवळ झाला.
यावेळी स्वाभिमान समता भूमी दिनास सचिव चंद्रकांत खरात, अध्यक्ष प्रा.किरण खाजेकर, खजिनदार बाबुराव सूर्यवंशी, सुनील शिणगारे, चेतन त्रिभुवन, विजय खाजेकर, भास्करराव लिहिणार, प्रा.बाळासाहेब सातुरे, डॉ शिवाजीराव पंडित, पी एस निकम, अशोक बागुल, अशोकराव जाधव, भाऊसाहेब लिहिणार, बबनराव जाधव, लक्ष्मणराव खरात, नगरसेविका जयश्री शेळके, विजय शेळके आदींसह सहकारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन चंद्रकांत खरात यांनी केले.