शेतकऱ्यांनी व्यापारी होणे काळाची गरज – कृषीतज्ञ हिरवे
राहुरी : शेतकऱ्यांनी आता व्यापारी होणे काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषक समाज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषीतज्ञ रमेश हिरवे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे भारतीय कृषक समाज पदाधिकार्यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रभारी ज्योती सुरसे यांच्या अध्यक्षतेखाली मंथन बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीची सुरुवात विद्यापीठाच्या गिताने करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना कृषीतज्ञ रमेश हिरवे म्हणाले की, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघटीत पद्धतीने उत्पादन प्रक्रिया व विपणन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी उत्पादन गट, स्वयंसहाय्यता गट व शेतकरी उत्पादक कंपन्या बनवुन एकमेकांच्या साहाय्याने त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने कृषी विभागाच्या अर्थ साहाय्याने कृषी उत्पादन प्रक्रिया सामुहिक सुविधा केंद्र व पणन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफ्याची शेती करावी.
यावेळी भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुभाष नलांगे यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीस जिल्हा व तालुका निहाय कार्यकारिणी उपस्थित होती.