अहमदनगर

हिरडगाव येथील गौरी शुगरने दिला तीन हजार रुपयांचा विक्रमी भाव; ग्रामस्थांनी मानले आभार

श्रीगोंदा | सुभाष दरेकर : अहमदनगर जिल्हा तसा सहकारी क्षेत्रात अग्रेसर. साखर कारखाने असल्याने येथील शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावले. परंतु बऱ्याचदा भावावरून, उचल देण्यावरून वाद होताना दिसले आहेत. दरम्यान आता यावर्षी गौरी शुगर कारखान्याच्या शेतकऱ्यांना खुशखबर मिळाली आहे.

हिरडगाव येथील गौरी शुगर (युनिट ४) कारखाना कि जो पूर्वी साईकृपा नावाने परिचित होता. या कारखान्याने हंगामातील पहिल्या १२ दिवसांत ७० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. विशेषतः ३००६ रुपये टनाप्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याचे उद्योजक बाबुराव बोत्रे पाटील यांनी जाहीर देखील करून टाकलंय. त्यामुळे शेतकऱ्यांत आता आनंदाचे उधाण आले आहे. गौरी शुगर ने आता ३००६ रुपयांचा भाव जाहीर केल्याने इतर कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत. हा कारखाना चालवणारे उद्योजक बोत्रे हे सोलापूर, लातूर, कोल्हापूर, उमरगा व श्रीगोंदे येथील कारखाना चालवित आहेत.

तसेच त्यांनी जो दर दिला आहे, असा जिल्ह्यात प्रथमच सर्वाधिक दर शेतकऱ्यांना मिळाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर कारखानदारांची अडचण झाली आहे. नागवडे व कुकडी या दोन्ही कारखान्यांनी इतरांच्या बरोबरीने दर देण्याची घोषणा केली होती. मात्र, या दोन कारखाऱ्यांच्या तुलनेत गौरी शुगरने जाहीर केलेली पहिली उचल जास्त आहे. त्यामुळे आता या बरोबरीने दर देण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. कारण तशी मागणी आता शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे. ही मोठी अडचण या कारखान्यांसाठी ठरू शकते.

गौरी शुगर कारखाना ठरतोय जीवनदायनी

हिरडगाव येथील पूर्वीचा साईकृपा व आजचा गौरी शुगर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी जीवनदायनी ठरतोय. बाबुराव बोत्रे पाटील यांनी हा कारखाना चालवायला घेतला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीचा दर देऊन शेतकऱ्यांना खूश केले आहे. त्यांच्याकडे कारखानदारीचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे जास्त भाव देऊन हा कारखाना ऊस उत्पादकांचे जीवनमान उंचावण्यासाठी फलदायी ठरला असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ऊसाला जास्त बाजारभाव देऊन हिरडगावचा नावलौकिक केला व शेतकरी राजाच्या हिताचा विचार केला म्हणून हिरडगाव ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संपत दरेकर, युवा नेते संतोष दरेकर, कुकडी सल्लागार समितीचे सदस्य मिलिंद दरेकर, सोसायटीचे चेअरमन झुंबर दरेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक भरत भुजबळ, ग्रामपंचायत सरपंच सुनिता दरेकर, उपसरपंच चिमाजी दरेकर, सदस्य अमोल दरेकर, दिपाली दरेकर, विद्याताई बनकर, व्हा चेअरमन कैलास दरेकर व सर्व संचालक मंडळ यांनी गौरी शुगर चे चेअरमन व व्यवस्थापन मंडळाचे आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button