ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी महावितरण कंपनीकडून माहिती अधिकारात मिळालेली उपयुक्त माहिती
राहुरी : शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असताना मात्र कृषि पंपांचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शेतकऱ्यांची महावितरण कंपनीच्या काही अधिकार्यांकडून मोठी फजिती केली जात असल्याच्या घटना आसपास पाहून तालुक्यातील तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी शेतकरी व ग्राहकांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून कशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात, याविषयी माहितीचा अधिकार कायदा २००५ अंतर्गत माहिती मागितली होती. या अंतर्गत म.रा.वि.वि.क., श्रीरामपूर विभागाचे जनमाहिती अधिकारी तथा अतिरिक्त क्रियाशील अभियंता भास्कर दे. चव्हाण यांनी उत्तरे दिली आहेत.
महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांचे शेतकरी वीज ग्राहकांसाठी असणारे कार्य व कर्तव्याची माहितीच्या उत्तरात ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होणेकामी महावितरण कंपनीकडून जनमित्रांची नेमणूक करण्यात आली असून संबंधित रोहित्र व वीज वाहिन्या यांचे देखभाल दुरुस्ती करणे, वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचे कारण शोधून तो तातडीने सुरळीत करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे, वीज ग्राहकांसाठी वेळोवेळी येणाऱ्या योजनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचविणे, शेतकरी वीज ग्राहकांसाठी या विभागाकडून जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मधून डी.पी.डी.सी योजनेद्वारे नवीन रोहित्रे बसविले जातात, ग्राहकांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कडून वेळोवेळी रोहीत्रांचे सर्वेक्षण केले जाते. अतिभारीत रोहित्र आढळून आल्यास सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसविणे बाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केले जातात, शेतकरी वीज ग्राहकांना शेताच्या बांधावर डी.पी. दिली जाते. ती डी.पी. जळाल्यानंतर किती दिवसाच्या आत देणे बंधनकारक असल्याबाबतची व त्यावर काही आपल्या विभागाचे बंधने आहेत याबाबतची माहितीत विद्युत रोहीत्र (डीपी) 3 दिवसांच्या आत दुरुस्त करा आणि तात्काळ बदलण्यासाठी फिल्टर युनिटमध्ये पुरेसा साठा ठेवावा असेही निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले आहेत.
तरी विद्युत रोहीत्र नादुरुस्त झाल्यावर अधिकारी टाळाटाळ करीत असतील तर सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार- 9890229269 यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली आहे.