राज्यस्तरीय युवा महोत्सवात प्रवरेच्या विद्यार्थिनीची निवड
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची कृषी विद्यापीठ संघात निवड
लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. हर्षाली शिंदे हीची नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणीत संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य-२०२३ साठी मुखनाट्य, एकांकिका आणि गायन प्रकारांत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संघात निवड झाली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मध्यवर्ती परिसर येथे राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य-२०२३ साठी नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली. त्यासाठी विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या विविध कृषी व संलग्नीत महाविद्यालयांनी संघ पाठविले होते. सदर निवड चाचणीसाठी कृषी जैवंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रियाशील सहभाग नोंदविला. यामध्ये हर्षाली शिंदे, आश्विनी गुडेकर, तेजस्विनी चौगुले, तन्मय शिंपी, अमोल माने, मनिष सोनवणे, कीर्ती पठारे, पुनम पंडित, पायल मचे आणि नम्रता पूरकर या विद्यार्थ्यांनी सामावेश घेतला.
विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसींग चौहाण आणि विद्यापीठ संगठित समिती यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडल्या. यातील कु. हर्षाली शिंदे हीची मुखनाट्य, एकांकिका आणि गायन या प्रकारांत विद्यापीठ संघात निवड झाली. यासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.प्रविण गायकर, तसेच प्रा.महेश चंद्रे, डॉ.अमोल सावंत, प्रा.स्वरांजली गाढे आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
कु. हर्षाली शिंदे हिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, अतांञिकचे संचालक डाॅ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, कृषी शिक्षण संचालिका डॉ. शुभांगी साळोखे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी यांनी अभिनंदन केले.