महाराष्ट्र
देवळाली प्रवरा कोविड सेंटर विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल;तक्रार समितीला निर्देश
औरंगाबाद प्रतिनिधी : कोविड १९ ची दुसरी लाट मार्च २०२१ पासून सक्रिय झाल्यानंतर नागरिकांनी कोविड सेंटर मध्ये उपचार घेतले होते. उपचारानंतर अशा कोविड रुग्णांकडून शासकीय दरा व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क आकारले होते. असे अतिरिक्त वैद्यकीय शुल्क परत मिळणेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व इतर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.
अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण बाधित झाले असताना अश्या रुग्णांना माफक दरामध्ये उपचार मिळणेसाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेने दि.१२/०९/२०२० रोजी ठराव घेऊन देवळाली प्रवरा डेडिकेटेड कोविड सेंटरची उभारणी केलेली होती. तसेच या कोविड सेंटरला जागा, इमारत, वीज, पाणी, बेड आदी सुविधा मोफत पुरविलेल्या असतांना देखील कोविड सेंटरने उपचारा दरम्यान रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा अतिरिक्त शुल्क वसूल केले. या संबंधीची लेखी तक्रार तसेच अतिरिक्त रक्कम परत मिळनेसाठी आप्पासाहेब ढुस व इतर यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसलेने आप्पासाहेब ढुस व इतर यांनी मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. सदरील याचिकेची सुनावणी होऊन मे. न्यायालयाने दि. १४/१०/२०२१ रोजी तक्रार दाखल करून घेऊन समितीने याचिका कर्त्यास वाढीव बिला बाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. याचिका कर्त्याचे वतीने अँड शिवराज कडू पाटील व शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.