विविध उपक्रमातून डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना दिलेली मानवंदना प्रेरणादायी – प्राचार्य टी. ई. शेळके
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : वाचन ही माणसाची आदिम आवड आहे. वाचन संस्कृती जोपासणारे डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार व आदर्श गृहरक्षक दलातील राजेंद्र देसाई, नवदुर्गा पुरस्कारप्राप्त सौ.आरती उपाध्ये यांचे वाचन प्रेरणा दिनी झालेले सत्कार सत्कार्याला बळ व प्रतिष्ठा देणारे असून भारतरत्न, आदर्श माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना वाचन संस्कृती जोपसणाऱ्या विविध उपक्रमातून वाचन प्रेरणा दिनी दिलेली मानवंदना आजच्या नवयुवकांना प्रेरणादायी असल्याचे मत माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि युवक वर्गात वाचन संस्कृतीची आवड निर्माण करणारे डॉ. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 92 व्या जयंती निमित्त विविध उपक्रमांनी संपन्न झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य टी. ई. शेळके बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे होते. प्रारंभी डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्यावर आधारित पुस्तकांचे परिसंवादात्मक प्रकाशन करण्यात आले. संयोजक व वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून ‘राष्ट्रभक्त डॉ.अब्दुल कलाम’ ही कविता सादर केली. कवयित्री संगीता फासाटे, कटारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्राचार्य टी. ई. शेळके यांनी आदर्श राष्ट्रपती, राष्ट्रभक्त शास्त्रज्ञ, पुस्तके आणि माणुसकीवर प्रेम करणारे डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रातील अनेक आठवणी सांगितल्या. भाषणप्रसंगी आपले शाळेतील गुरुजी श्रोतेवर्गात शेवटी बसलेले पाहून बाहेरून वाट शोधत गुरुजींचे दर्शन घेऊन व परत व्यासपीठावर येऊन बसणारे डॉ. कलाम म्हणजे नम्र आणि किती सुसंस्कृत होते, त्याची प्रचिती येते. समाजातील नैतिक अधिष्ठान असलेले डॉ. कलाम यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतात माणूस वागतो यावर त्याचे मोठेपण लक्षात घेतले जाते, असे सांगून त्यांनी प्रेरक वाचन सन्मान केले.
नगर जिल्ह्यात 1978 पासून साहित्य आणि वाचन संस्कृतीसाठी स्वतःला वाहून घेणारे डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार तसेच गृहरक्षक दलांचे राजेंद्र देसाई यांना लायन्स क्लब पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच केडगाव येथील डॉ.शारदा महांडुळे यांच्या प्रणव हॉस्पिटल तर्फे दुर्वांकुर नवदुर्गा पुरस्कार मिळाल्या बद्दल सौ. आरती गणेशानंद उपाध्ये यांचा शाल, बुके, पुस्तके देऊन प्राचार्य शेळके यांनी सत्कार केले.
यावेळी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रा शिवाजीराव बारगळ, राजेंद्र देसाई, सौ.आरती उपाध्ये यांनी मनोगतातून वाचन हीच जीवन संजीवनी असून डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी आणि घट ंस्थापनेच्या पुण्यसमयी झालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी वाचन हीच आपली खरी जीवनशिदोरी असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून डॉ.ए. पी. जे.अब्दुल कलाम म्हणजे भारताचे कोहिनूर हिरे असल्याचे सांगून त्यांच्या जीवन चरित्रातील प्रसंग सांगितले. सूत्रसंचालन वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष कवयित्री संगीता फासाटे यांनी केले तर पत्रकार बाबासाहेब चेडे यांनी आभार मानले.