शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता जागा उपलब्ध करून द्या- पवार
राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात शासकीय महाविद्यालयाकरिता तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी मंत्रालयात भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार बुलढाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, नवी मुंबई, पालघर, जालना, अहमदनगर, गडचिरोली, वाशीम, ठाणे या जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीने अहमदनगर जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी जागेची पाहणी केली व आपल्या अहवालात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या १० कि.मी. परिघातील १३ एकर जागा जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली होती. दि. २८ जुन २०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत वरील ९ जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी मान्यता दिली असून अहमदनगर जिल्ह्याला जागेअभावी मान्यता मिळू शकली नाही. सदरील बैठकीत असेही म्हंटले आहे की, जर अहमदनगर जिल्ह्यात जागा उपलब्ध झाल्यावर तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्यात येईल.
अहमदनगर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी ससून रुग्णालय पुणे, व घाटी रुग्णालय संभाजीनगर या ठिकाणी जावे लागत आहे. सदरील अंतर जास्त असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तात्काळ उपचार न मिळाल्याने सर्वसामान्य जनतेला मृत्यूच्या दारात जावे लागत आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने कोव्हीड काळात रुग्णांचे हाल तसेच मृत्यू झाला आहे. जर अहमदनगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असते तर बहुतांश मृत्यू रोखता आले असते. सद्यःस्थितीत अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी दोन ते तीन हजार रुग्ण येत असतात. यामुळे जिल्हा रुग्णालयावरती मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवेचा ताण येत असून रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.
महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा असून या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा न मिळणे हि अहमदनगर जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने लांच्छनास्पद बाब आहे. हा विषय रुग्णांच्या दृष्ठीने अतिशय संवेदनशील असल्याने आपण गांभीर्याने या विषयाची नोंद घेऊन रुग्णहीत लक्षात घेता जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेकरीता लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी. संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हिंगोली जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय महाविद्यालय स्थापनेकरीता मान्यता देण्यात आली आहे. तरी तात्काळ अहमदनगर जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेकरीता जागेची उपलब्धता करावी, अन्यथा याकामी उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल असे पवार यांनी म्हटले आहे.