जाणून घेऊयात कोण आहेत सप्टेंबर महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. सप्टेंबर महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन मच्छिंद्र घोलप व कृषि उद्योजक आयडॉल म्हणुन विजय देसाई यांची निवड झालेली आहे. मच्छिंद्र घोलप हे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी असून कृषि पदवीधर विजय देसाई हे मु.पो. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील कृषि उद्योजक आहेत.
शेतकरी आयडॉल मच्छिंद्र घोलप हे मु.पो. हनुमंतगाव, ता. राहाता, जि. अहमदनगर येथील शेतकरी असुन त्यांनी ऊस पिकामध्ये विविध पिकांचे आंतरपीक जसे की बटाटा, हरभरा घेऊन ऊस उत्पादन खर्च कमी केला आहे. खोडव्या उसामध्ये पाचट अच्छादन, पूर्व हंगामी उसाचे एकरी 80 टनापर्यंत उत्पादन, शेतीमध्ये यांत्रिकीकरण, पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक व तुषार पद्धतीचा वापर तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पात प्रात्यक्षिकांचे यशस्वीरित्या आयोजन करून इतर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. त्यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार तसेच ICAR Best Farmer अवॉर्ड व इतर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
तसेच पदव्युत्तर महाविद्यालय, मफुकृवि, राहुरी येथे कृषिचे शिक्षण घेतलेले कृषि पदवीधर आयडॉल कृषि उद्योजक विजय देसाई यांनी विजय कृषी उद्योगाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या बांधावर जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार केला. तसेच कृषी विक्रेत्यांना उच्च दर्जाची कीटकनाशके, बियाणे, खते यांचा पुरवठा केला. त्यांनी व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे आपल्या कृषी उद्योगाच्या माध्यमातून 250 पेक्षा जास्त व्यक्तींना रोजगार निर्माण केला आहे आणि विविध देशांना भेटी दिल्या आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.