श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा – संदीप आसने
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संदीप आसने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्रीरामपूर तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झालेला असून तालुक्यात सध्या पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे. शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत आलेला असून वास्तविक श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर झालेली आहे.
गेल्या एक महिन्यापासून पावसानं उघडीप दिल्याने श्रीरामपूर तालुक्यातील पिके जळू लागली आहेत. अशा परिस्थितीत चिंतांतुर शेतकरी वर्गाला दिलासा देणं सरकारचे काम असतांना अद्यापपर्यंत सरकारकडुन कोणतीही पावलं उचलली गेली नाहीत. शेतकऱ्यांची डोळे आभाळाकडे लागली आहेत. सरकार काही तरी मदत देईल ही अपेक्षा लागुन राहीली आहे. पावसांनं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.
या परिस्थितीत शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतची मागणी ईमेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. सदरचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती आसने यांनी दिली आहे.