बिबट्याच्या हल्ल्यात सात ते आठ शेळ्यांचा मृत्यू
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे गोंधवणी रस्त्यावर राहणाऱ्या सोनू शिंदे यांच्या वस्तीवर सोमवारी पहाटे २ ते ३ वाजे दरम्यान अचानक एका बिबट्याने हल्ला करून जवळपास ७ ते ८ शेळ्यांचा फडशा पाडला तसेच याआधी अनेक कुत्र्यांचाही फडशा पाडला.त्यामुळे परिसरात कायमची दहशत निर्माण झाली आहे.
शिरसगाव परिसरात ३ ते ४ वर्षांपासून बिबट्याचे व त्यांचे पिल्लांचे वास्तव्य आहे. परंतु अनेक वेळा तक्रारी करूनही वन खात्याचे दुर्लक्ष असल्याने कोणी फिरकत नाही व पिंजरा लावला जात नाही, अशी अनेकांची तक्रार आहे. एखाद्याचा बळी गेल्यावर सर्व जागे होऊन मगच कारवाई होईल की काय असे नागरिकांना वाटते. सर्वत्र वाढते हल्ले होत आहे.
या वस्तीवर शासकीय वैद्यकीय अधिकारी भांड व शिरसगाव तलाठी कदम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. या ठिकाणी लवकरात लवकर वन खात्याने पिंजरा लावावा व होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात तसेच पोलीस विभाग व तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी योग्य ती पुढील कार्यवाही करावी अशी मागणी खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मुदगुले यांनी केली आहे.