येत्या निवडणुकीत भाजपचा विचार करावा लागेल- पोखरकर
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने इपीएस ९५ पेन्शन धारकांचा श्रीरामपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या निर्देशानुसार व पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा श्रीरामपूर येथून टिळक वाचनालयापासून गांधी पुतळा मेन रोड मार्गे श्रीरामपूर प्रांताधिकारी यांचे कार्यालयापर्यंत नेण्यात आला.
त्याआधी टिळक वाचनालय येथे सभा घेण्यात आली. यावेळी पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ, नवाज शेख, डी एस पवार आदींची भाषणे झाली. प्रांताधिकारी श्रीरामपूर कार्यालयासमोर मोर्चा आल्यावर घोषणा देऊन कार्यालय दणाणून सोडले. यावेळी तेथेही कामगार नेते नागेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करून पेन्शनर्स संघटनेला पाठींबा दिला. विनायक लोळगे यांनी व्यथा सांगितली.
त्यावेळी सुभाष पोखरकर म्हणाले, पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढ समस्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांनी नवी दिल्ली येथे श्रम मंत्री यांचेशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ४ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अमानुष अत्याचार करून त्यांना अटक केली. तसेच ३ ऑगस्ट रोजी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रम मंत्री यांनी नकारात्मक भूमिका घेतली. या दोन्ही घटनेचा निषेध करीत आहोत.
गेली ८ ते ९ वर्षे आपण पेन्शन प्रश्नावर लढा देत आहोत.परंतु सरकार दखल घेत नाही.उलट ४ ऑगस्टला दिल्लीला कमांडर अशोकराव राउत यांना अमानुषपणे वागवून अटक करण्यात आली. तसेच ३ ऑगस्टला कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी संसदेत अयोग्य उत्तरे दिली. याचा निषेध करीत आहोत. एव्हढ्या प्रमाणावर लढा देऊन सुद्धा केंद्र सरकार याची दखल घेत नाही तर येथून पुढच्या काळात आम्हाला देखील भारतीय जनता पक्षाबद्दल हिमाचल सारखा निश्चित विचार करावा लागणार आहे आणि तोही येत्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व पेन्शनर्स निश्चित विचार करतील.
यावेळी श्रीरामपूर तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, सचिव विनायक लोळगे, संगमनेर उपाध्यक्ष सुलेमान शेख, याकुब भोसले, सुरेश कटारिया व पारनेरचे विठ्ठलराव गागरे, तसेच दिलावर शेख, संपतराव मुठे, अप्पासाहेब पटारे यांचेसह मोठ्या प्रमाणावर पेन्शनर उपस्थित होते. सुभाष पोखरकर, राधाकृष्ण धुमाळ यांच्या हस्ते प्रांताधिकारी श्रीरामपूर यांच्या वतीने नायब तहसीलदार हेमलता वाकडे यांनी निवेदन स्वीकारले व शासनाकडे, केंद्राकडे, वरिष्ठांकडे योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविण्याचे आश्वासन दिले.