मुळा धरणातून पाणी आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी
राहुरी | अशोक मंडलिक : मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी तात्काळ पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी डावा कालव्या अंतर्गत लाभक्षेत्रातून होत आहे. यंदाचा पावसाळी हंगाम सुरू होऊन तब्बल सव्वा दोन महिने उलटून गेले आहे. जून – जुलै या महिन्यात पावसाची जेमतेम हजेरी राहिली होती. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरीही अजून पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांसह सारेच चिंताग्रस्त झाले आहेत.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणात आज अखेर 20 टीएमसी पर्यंत पाणीसाठा झालेला आहे. मुळा धरणाच्या उजवा कालव्याखालील राहुरी तालुक्यासह नेवासा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील शेती व शेती सिंचनाचे क्षेत्र अवलंबून आहे तर राहुरी तालुक्यातील डावा कालव्याखालील जवळपास दहा ते पंधरा गावांमधील पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र हे डाव्या कालव्यामुळे ओलिताखाली येते. याबरोबरच या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागतो.
मात्र यंदा पावसाच्या आशेने डाव्या कालव्या खालील शेतकऱ्यांनी कपाशी, भुईमूग, सोयाबीन, मका, बाजरी आदी खरिपाच्या पिकांच्या पेरण्या केलेल्या आहेत. मात्र आता या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मुळा धरणात जवळपास 75 टक्क्याहून अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे धरणातून तात्काळ दोन्ही कालव्यासाठी पाणी सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मागील महिन्यात शासनातील काही महत्त्वाच्या मान्यवरांनी मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता कधी पाणी सोडले जाणार ! याकडे उजव्या व डाव्या कालव्या खालील भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या वर्षी पावसाचे आणि शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. सध्या मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांच्या रोशाची वाट न पाहता जलसंपदा विभागाने तात्काळ दोन्ही कालव्यातून पाण्याचे रोटेशन सोडावे.
_ युसूफभाई देशमुख, प्रगतशील शेतकरी, बारागाव नांदूर, तालुका – राहुरी.