महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडुन आले उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागांतर्गत अनुयोजीत संशोधन योजना कार्यरत आहे. या योजनेत सामाविष्ठ असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव, मातापूर व कारेगाव या गावातील शेतकर्यांच्या शेतावर विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वीत सूत्रकृमी संशोधन योजनेतील किटकशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पल्लवी पाळंदे, संशोधन सहयोगी विनोद पवार, हरिचंद्र भुसारी व आंतरविद्या शाखेचे कृषि सहाय्यक शेषराव देशमुख व आदिनाथ सुर्यवंशी यांनी या गावातील संपर्क शेतकरी विकास झगडे, राहुल भुजबळ, महेश लवांडे, पंढरीनाथ उंडे यांच्यासह इतर शेतकर्यांच्या शेतावर भेटी दिल्या.
या भेटीदरम्यान विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कर्मचार्यांनी आले उत्पादक शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी या चमुने संबंधीत शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी पिकावरील किडींचे विश्लेषण करुन आणलेले नमुने सुक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने दाखवून सूत्रकृमी किडीची ओळख प्रात्यक्षिकाद्वारे करुन दिली. सध्या शेतकर्यांच्या आले पिकावर सूत्रकृमी किडींचा प्रादुर्भाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्या अनुशंगाने सूत्रकृमी कीड व्यवस्थापन विषयी सविस्तर मार्गदर्शन करुन किड नियंत्रणासाठी काय उपाय योजना कराव्यात यासंदर्भात विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन केले.
या प्रक्षेत्र भेटीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक तथा कृषि किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.एस. पाटील व आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी प्रगतशील शेतकरी बापुसाहेब उंडे, शंकरराव चौधरी, वसंतराव नागुडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.