देवेंद्र लांबे पाटील यांचा दिल्लीत सन्मान
राहुरी – येथील मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना बहुजन ग्रामविकास सेवा (असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय समाजभुषण-२०२३ पुरस्काराने दिल्लीत सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री. लांबे पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यात सामाजिक काम करत आलेले आहेत. त्यांनी मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती, जिजाऊंच्या लेकी समूह स्थापन करत विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. तसेच त्यांनी युवकांची मोठी फळी निर्माण करत आर्थिक अडचणीत असणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण, वैद्यकीय मदत, अपघातग्रस्तांना मदत, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत कार्य करण्याबरोबरच राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या वृत्तीच्या विरोधात लढा उभारण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. नगर मनमाड रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत लढा उभारला. या सर्व कामाचा आढाव घेत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “राष्ट्रीय समाज भूषण” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे “राष्ट्रीय समाज भुषण -२०२३” या पुरस्कारासाठी सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री. लांबे यांना समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ना.नरेंद्र पाटील, खा.सदाशिव लोखंडे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवले, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवकर, कमलाकर कोते, संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, उपजिल्हाप्रमुख जयवंत पवार, अण्णासाहेब म्हसे, संपत काका जाधव, सुनील कराळे, अशोक तनपुरे, श्रीकांत पवार, रोहित नालकर, प्रशांत खळेकर, महेंद्र उगले, महेंद्र शेळके आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.