खा.डाॅ. विखेपाटील यांच्या कार्यालयासमोर ईपीएस 95 पेन्शनरांचा बैठा सत्याग्रह
अहमदनगर – राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे निर्देशानुसार व पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर यांचे नेतृत्वाखाली अहमदनगर चे खासदार डॉ.सुजय विखेपाटील यांचे कार्यालयासमोर जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनरांनी बैठा सत्याग्रह करून पेन्शन वाढीसाठी धरणे आंदोलन केले.
जिल्ह्याचे दक्षिण भागातील २०० चे वर पेन्शन धारक सकाळी ११ वाजेपासून ३ वाजेपर्यंत खा. विखे पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शनास बसले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, महिला अध्यक्षा आशाताई शिंदे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत वाळके, शहराध्यक्ष संजय मुनोत यांनी आंदोलनाची आवश्यकता सांगून कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली देशभर चालू असलेल्या आंदोलनाची माहिती व मार्गदर्शन केले.
प्रमुख मार्गदर्शक सुभाष पोखरकर यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या मागण्या मान्य होतील अशी आशा व्यक्त करत केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास सप्टेंबर महिन्यात मोठ्या आंदोलनाचे तयारीसाठी सर्वांनी तयारीस लागण्याचे तसेच येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार ( नो पेन्शन नो व्होट ) घालण्यात येईल असे जाहीर केले. यावेळी शिवसेना ( शिंदे गट) प्रमुख सातपुते यांनी आंदोलन स्थळी येवून आपल्या मागण्या मुख्यमंत्री यांना समक्ष भेटून त्यांना कळविण्याचे आश्वासन दिले व राष्ट्रीय संघटनेकडून कार्यगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष पोखरकर यांचा सत्कार केला.
नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, पाथर्डी तालुकाध्यक्ष हौसराज राजळे, श्रीगोंदा उपाध्यक्ष जयसिंग शेंडगे, डॉ.गाडेकर यांचेसह नगर शहर, नगर तालुका, पाथर्डी, जामखेड, नेवासा तालुक्यातील पेन्शनर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासदार बाहेरगावी असल्याने त्यांचे पी.ए. कडे निवेदन देण्यात आले.