महात्मा फुले कृषि विद्यापीठाबरोबर महाजेनकोचा सौर उर्जा प्रकल्पाचा सामंजस्य करार
राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्यामध्ये 100 मे.वॅ. सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या कार्यक्रमास ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, उप मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी. अन्बलगन, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, मराविमं सुत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी विद्यापीठाच्या वतीने तर महानिर्मितीचे वतीने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगन यांनी स्वाक्षरी केली. या करारामुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील एका अभिनव घटनेची नोंद केली. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अथक प्रयत्नाने हा प्रकल्प मंजुर झाला आहे.
या कराराचे वैशिष्ट्ये असे की राहुरी विद्यापीठाच्या 400 एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारणार असून ह्या प्रकल्पासाठी सुमारे 472 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. महानिर्मितीद्वारे राहुरी कृषी विद्यापीठास वीज बिल कमी करण्यासाठी 500 किलोवॅट क्षमतेचे सौर संच उभारणी करून देण्यात येणार आहे. या सौर प्रकल्पामुळे 20 व्यक्तींना कायमस्वरुपी तर 100 व्यक्तींना हंगामी रोजगार उपलब्ध होणार आहे.