महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत मानांकन मिळविणारे महाराष्ट्रातील एकमेव कृषि विद्यापीठ
राहुरी विद्यापीठ : मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारद्वारे जाहिर करण्यात आलेल्या 2023 च्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत ( N.I.R.F ) महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे एकमेव कृषि विद्यापीठ आहे व देशातील कृषि विद्यापीठांमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाने 36 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
सन 2016 या वर्षापासून मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारद्वारे देशातील प्रमुख संस्था/विद्यापीठांसह 10 वेगवेगळ्या प्रवर्गात क्रमवारी जाहिर केली जाते. या आराखड्यात देशभरातील संस्थांची क्रमवारी लावण्याची पध्दत आहे. विविध विद्यापीठे आणि संस्थांच्या क्रमवारीसाठी व्यापक मापदंड ठरविण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारद्वारे स्थापन केलेल्या कोर समितीद्वारे प्राप्त झालेल्या एकुण शिफारशींमधून ही कार्यपध्दती घेण्यात आली आहे. या क्रमवारीमध्ये शिक्षण, शिक्षण आणि संशोधन, संशोधन आणि व्यावसायीक पध्दती, पदवी परिणाम इ. निकषांचा समावेश होतो.
सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्रथमच कृषि प्रवर्गाचा राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. देशातील 152 कृषि संलग्न संस्थांनी या क्रमवारीसाठी अर्ज केला होता. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने या क्रमवारीसाठी प्रथमच अर्ज केला होता. महात्मा फुले कृषि विद्यापीठाला देशातील पहिल्या 40 कृषि संलग्न संस्थांच्या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. महाराष्ट्र राज्यातील हे एकमेव कृषि विद्यापीठ आहे ज्याला राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत मानांकन मिळाले आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रस्ताव सादर करतांना विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी, विद्यार्थी संख्या, प्राध्यापक संख्या, विद्यार्थी व प्राध्यापक यांचे गुणोत्तर, कायमस्वरुपी प्राध्यापक, आर्थिक स्त्रोत व त्यांचा योग्य वापर, प्रसारीत संशोधन लेख व त्यांची गुणवत्ता, मंजुर पेटेन्टस्, विद्यापीठ स्तरावरील परीक्षा व त्यांची गुणवत्ता, आचार्य पदवीधारक विद्यार्थी, परराज्यातील व परदेशातील विद्यार्थ्यांची संख्या, मुलींची संख्या, आर्थिक दृष्ट्या मागासलेच्या व अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा या सर्व बाबींचा अंतर्भाव करण्यात आला होता. सदरील सर्व गुणांच्या निकषांवर या विद्यापीठाला नामांकन देण्यात आले.
हे मानांकन प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, माजी अधिष्ठाता डॉ. पी.एन. रसाळ, माजी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, माजी कुलसचिव प्रमोद लहाळे, माजी नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, नियंत्रक विजय पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, सर्व कृषि महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.