वर्षानंतरही शेतकरी अनुदानापासून वंचित, प्रहारचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
सुरेशराव लांबे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेत केली मागणी
राहुरी – मागील वर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे या सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. शासनाने मोठ्या दिमाखात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करून आनुदानात वाढ केली खरी. परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन दि. २५ मे, २०२३ रोजी अहमदनगर जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी सन 2022 मध्ये सततच्या पावसाने महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर संपूर्ण राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा, कपाशी, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसूल मंत्री व इतर शासनातील प्रतिनिधी यांनी प्रशासनातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, बि.डि.ओ यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन राहुरी तहसील कार्यक्षेत्रातील राहुरी, ब्राह्मणी, ताहाराबाद, वांबोरी, सात्रळ, देवळाली, टाकळीमिया या सात मंडलात समान पाऊस झाला असुन या सर्व सात मंडलाचे पंचनामे करून शासनाने जाहीर केलेल्या रक्कमेप्रमाणे नुकसान भरपाईची राहुरी तहसीलदार यांनी शासनाकडे माहिती पाठवली.
परंतु सात मंडलापैकी राहुरी मंडलाला 12 कोटी रुपये मंजूर झाले. तेही शंभर टक्के जमा झाले नाही व इतर सहा मंडलामध्ये अजूनही कुठल्याच शेतकऱ्याला अनुदान मिळालेले नसून ते अनुदान त्वरित मिळण्यात यावे. तसेच एप्रिल व मे 2023 मध्ये संपूर्ण राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झालेली असून त्यामध्येही कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचेही पंचनामे करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान एकरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच सहा मंडळातील शेतकऱ्यांना त्वरित अनुदान न मिळाल्यास आ. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू हे सत्तेत असूनही आम्हाला नाविलाजास्तव शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल, यातुन होणार्या दुष्परिणामास शासन व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला.सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, महसूलमंत्री, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चुभाऊ कडू यांना पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी प्रहारचे युवा तालुका प्रमुख ऋषिकेश इरुळे, राजु ठुबे, नानासाहेब पवार, जगन्नाथ चौधरी, देविदास मकासरे, बाळासाहेब तिडके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.