गावोगावी वाचन संस्कृती वाढविली तरच नीती आणि नाती टिकतील – देशमुख
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : जागतिकीकरणात माणुसकीची ज्योत सदैव तेवत ठेवणे गरजेचे आहे. आज संस्कृतीपेक्षा आर्थिक लाभ पाहिला जात आहे. महात्मा फुले यांनी ‘विद्याविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविधेने केले’ हे लक्षात घेऊन गावोगावी विद्या देणारी वाचन संस्कृती वाढविली तरच नीती आणि संस्कृतीशील नाती टिकतील, समाजभान, लोकशाही वृत्ती निर्माण होईल, असे मत कडा येथील मराठवाडा विभाग संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष आणि श्रीरामपूर वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुभाषराव देशमुख यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या ‘वाचल तर वाचाल’ या उपक्रम अंतर्गत डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित विविध प्रबोधन पुस्तके कडा येथील श्रीराम वाचनालयास देताना ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे कार्यवाहक बंडोपंत जोशी, सतिश ओव्हाळ, बाळासाहेब खेडकर यांनी ‘वाचल तर वाचाल’ या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांची पुस्तके वाचनीय आणि संस्कारशील असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत सुभाषराव देशमुख यांचे आभार मानले.