पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी विद्यापीठ : पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच त्याचे संवर्धन करण्याची सर्व मानव जातीमध्ये जागृकता निर्माण होण्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा भरमसाठ वापर तसेच प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पाण्याचे व मातीचे प्रदुषण तसेच औद्योगीकरणामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असून जागतीक तापमानात वाढ झाल्यामुळे शेती क्षेत्रावर अनिष्ट परिणाम होत आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच पृथ्वीच्या संवर्धनाबरोबरच संरक्षण होणे शक्य असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात अहमदनगर लोकल सेंटरच्या अभियांत्रिकी संस्था, महात्मा फुले कृषि विद्यापीठ व अहमदनगर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने वसुंधरा दिवस-2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ॲड. सुधाकर यारलागड्डा प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अहमदनगर लोकल सेंटरच्या अभियांत्रिकी संस्थेचे अध्यक्ष इंजि. एम.एम. अनेकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, अहमदनगरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील, कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अतुल अत्रे व अभियांत्रिकी संस्थेचे मानद सचिव इंजि. अभय राजे उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु डॉ. पाटील पुढे म्हणाले की, भारत हा जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनला आहे. जास्त लोकसंख्येचा भार पर्यायाने अगोदरच मर्यादित असलेल्या नैसर्गिक संसाधनांवर पडत असून त्यामुळे पाणी, माती व हवा प्रमाणापेक्षा जास्त प्रदुषीत झालेली आहे. प्रत्येकाने आपल्या गरजा मर्यादित ठेवण्याबरोबरच, प्लॅस्टिकचा मर्यादित वापर करणे, कचरा गोळा केल्यानंतरचे योग्य नियोजन तसेच पुर्नवापराचे नियोजन केले तरच प्लॅस्टिकचे दुष्परिणाम कमी करता येतील. ॲड. सुधाकर यारलागड्डा यांनी आपल्या भाषणात आपली संस्कृती तसेच वारसा जपण्याचे आवाहन करुन युवकांनी आपल्या विवेक बुध्दीचा वापर करुन स्वतःला घडविण्याचे आवाहन केले. पैशाच्या मागे न धावता गौरवशाली, समाधानी जीवन जगा व शेतीला न विसरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी प्रत्येकाची प्रबळ अशी इच्छाशक्तीच पृथ्वीला वाचवू शकते असे सांगितले. पृथ्वीतलावरील जैवविविधता जपण्यासाठी शाश्वत उपाययोजना राबविण्याविषयी तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ यादृष्टीने करत असलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दिलीप पवार यांनी केले. अहमदनगर लोकल सेंटरच्या अभियांत्रिकी संस्थेविषयीची माहिती इंजि. एम.एम. अनेकर यांनी दिली. श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने लोकअदालत तसेच जनतेच्या कायदेविषयक जाणीवा समृध्द करण्यासाठी आयोजीत करण्यात येणार्या शिबिरांची माहिती दिली. डॉ. अतुल अत्रे यांनी वसुंधरा दिवस साजरा करण्याचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. अभय राजे यांनी तर आभार अभियांत्रिकी संस्थेचे माजी मानद सचिव इंजि. एच.बी. थिगळे यांनी केले. कार्यक्रमासाठी हाळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल शिर्के, डॉ. दिनकर कांबळे, डॉ. राजेंद्र हिले, अभियांत्रिकी संस्थेचे पदाधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, हाळगाव कृषि महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.