संगमनेरच्या काही भागात पावसाबरोबर वादळी वाऱ्यासह गारपीट
शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान
संगमनेर | बाळासाहेब भोर : तालुक्यातील मौजे पेमगिरी, नांदुरी दुमाला, निमगाव पागा, सावरचोळ व इतर काही गावांत आज अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. पावसाबरोबरच गारपीट व जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतातील पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत.
शेतातील कांदा, टोमॅटो, कोबी, झेंडू ही नगदी पिकं झोडपून काढली आहेत. तसेच घास, मका, ज्वारी ही चारा पिके पूर्णतः भुईसपाट झाली आहेत. अगोदरच वाढती महागाई, बाजारभावाची अनिश्चितता यामुळे शेतकरी पूर्णतः पिचला असून त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील पिके वाचविण्याचे मोठं आव्हान बळीराजासमोर उभं राहिलं आहे.
अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी तुर्तास मोडकळीस आलेला असताना महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.