कृषी
जाणुन घेऊयात कोण आहेत मार्च महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. मार्च महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन विष्णु जरे व कृषि उद्योजक म्हणुन ॲड. प्रदिप खेडकर यांची निवड झालेली आहे. विष्णु जरे हे मु. बहिरवाडी पो. जेऊर, ता.जि. अहमदनगर येथील शेतकरी असून कृषि पदवीधर ॲड. प्रदिप खेडकर हे मु.पो. करंदी, ता. शिरुर, जि. पुणे येथील कृषि उद्योजक आहेत.
शेतकरी आयडॉल विष्णु जरे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले कांदा बियाणे ( बसवंत 780, फुले समर्थ ) व लसूण पीक ( फुले बसवंत, फुले निलीमा ) या वाणांचे बियाणे महाराष्ट्रासह परराज्यातही पोहचविले आहे. त्यांनी सेंद्रिय शेती अंतर्गत गांडूळ खत, नाडेप, जिवामृत, दशपर्णी अर्क, जिवाणू खते व हिरवळीच्या खतांचे प्रात्यक्षिक शेतीमध्ये घेत आहेत. तसेच केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या समन्वयाने पाणलोट विकासाशी निगडीत विविध कामे गावाच्या परिसरात केलेली आहेत.
कृषि उद्योजक ॲड. प्रदिप खेडकर यांनी कोल्हापूर कृषि महाविद्यालयातुन बी.एस्सी. कृषिची पदवी घेतलेली असून एल.एल.बी. चे शिक्षणही त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्यांनी सन 2016 साली सुरु केलेल्या हर्षित ॲग्रो फुडस् ॲण्ड एक्सपोर्ट या उद्योगाद्वारे शास्त्रीय पध्दतीने मुरघास ( कॉर्न सायलेज ) तयार करुन त्याची विक्री पुणे, मुंबई, कोकण, उर्वरीत महाराष्ट्र व गुजरात येथील गोपालकांना करीत आहेत. त्यांनी व्यवसायामध्ये उच्चतम गुणवत्ता, वेळेवर माल पोहचविण्याची हमी व वर्षभर पुरवठा ही त्रिसुत्री जपली आहे.
रोटरी क्लब, पुणे कॅम्पच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील दुर आंतरावरुन शाळेला पायी ये-जा करणार्या 50 गरजु मुलींना सायकल वाटप, शाळांना वॉटर फिल्टर, खेळाचे साहित्य व ई लर्निंग संचाचे वाटप केले आहे. परिसरातील 100-200 शेतकर्यांच्या पिकांना हमीभाव देण्याबरोबरच लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य असे मार्गदर्शन ते करतात. त्यांनी 20 मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.