कृषी

जमिनीची जैविक सुपीकता महत्वाची- विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे

महात्मा फुले कृषि विद्यापीठात कृषि कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक संपन्न
राहुरी विद्यापीठ : रासायनिक खतांबरोबर किटकनाशकांच्या अतिरेकी वापराबरोबरच प्लॅस्टिक तसेच विविध धातु या विघटन न होणार्या पदार्थांमुळे जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. विघटन न होणार्या पदार्थांमुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंचे प्रमाण घटत आहे. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होत असून पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जमिनीची जैविक सुपिकता महत्वाची असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे मुंबई दुरदर्शनच्या सह्याद्रि वाहिनीची कृषि कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. तानाजी नरुटे बोलत होते. या प्रसंगी मुंबई दुरदर्शन केंद्राचे कार्यक्रम निर्माता भारत हरणखुरे, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, हाळगांव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, नागपूर दुरदर्शन विभागाचे निर्माता मनोज जैन, पुणे विभागाचे निर्माता विनायक मोरे, मुंबई दुरदर्शन केंद्रातील निर्माता विजय मोदड व प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये माहे एप्रिल ते जून-2023 साठीच्या प्रसारीत करण्यात येणार्या कृषि विषयक विविध विषयांची चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले. या बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार मनोज जैन यांनी मानले. या बैठकीसाठी राज्यातील कृषि विद्यापीठांचे, कृषि विज्ञान केंद्रांचे, वसंतदादा साखर संस्थेचे प्रतिनिधी तसेच विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button