अहिल्यानगर
उंदिरगावात आदर्श शिवजयंती साजरी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर वाजत गाजत साजरी केली जाते. मात्र उंदिरगाव ग्रामस्थ वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. शिवराय हे रयतेवर प्रेम करणारे व त्यांची काळजी घेणारे राजे होते. सध्या सर्वत्र सर्दी खोकला तापाची साथ सुरू आहे. गावातील अनेक बालक व वृद्धांना त्रास होत आहे व वारंवार वाफ घ्यावी लागत आहे. नुकताच उंदिरगावात श्रीमानयोगी वाचन सोहळा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचे कौतुक झाले.
या सोहळ्यातील तरुण वाचकांनी अस ठरविलं की रयतेच्या राजाची जयंती अनोख्या पद्धतीने व लोकपयोगी पद्धतीने साजरी करायची. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने दोन नेब्युलायझर मशीन व वाफेच्या ट्यूब उंदिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात या वाचकांकडून आरोग्य केंद्र प्रमुख डॉ राजगुरू व आरोग्य केंद्र स्टाफ यांच्याकडे देण्यात आल्या. आरोग्य केंद्र प्रमुख यांनी श्रीमानयोगी वाचन सोहळा वाचकांचे आभार मानले व जास्तीत जास्त रुग्णांना या मशीन मार्फत सेवा देणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक दिलीप भालदंड, ग्रा प सदस्य प्रकाश ताके, बजरंग गिर्हे, नवनाथ आढाव, किशोर नाईक, नितीन निपुंगे, अजिंक्य गलांडे, रणवीर पाऊलबुद्धे, अजिंक्य गायके, मनोज बोडखे, रामदास फुलवर, शुभम मोरे, निलेश बोधक, पवन पाऊलबुद्धे आदी उपस्थित होते. आदर्श शिवजयंती साजरी केल्याबद्दल ग्रामस्थांकडून या तरुणांचे कौतुक होत आहे.