कृषी
श्रीरामपूर बाजार समितीचे मोकळा कांदा मार्केट पूर्ववत सुरू – प्रभारी सचिव साहेबराव वाबळे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात मंगळवार दि.१४ मार्च पासून मोकळा कांदा लिलाव पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा मार्केटमध्ये मागील वर्षी सुरु झालेला मोकळा कांदा लिलाव कांद्याची आवक संपल्याने डिसेंबर अखेर बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने मंगळवार दि.१४ मार्चपासून मोकळा कांदा मार्केट पूर्ववत करण्यात येणार असून सदर मोकळ्या कांद्याचे लिलाव मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस सकाळी १०:०० आणि दुपारी ४:०० या दोन सत्रामध्ये होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा जागेवर विक्री न करता बाजार समितीमध्येच विक्री करावा असे आवाहन श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठीच बाजार समितीने मोकळा कांदाबाबत मार्केटचा निर्णय घेतला असून मागील वर्षी श्रीरामपूर, वैजापूर, राहुरी, गंगापूर, राहता तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मोकळा कांदा मार्केटला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मोकळा कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा विक्री खर्च मोठ्या प्रमाणात वाचत असल्याने शेतकऱ्यांनी देखील मोकळा कांदा मार्केटचा लाभ घ्यावा. बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांद्याची पट्टी त्याच दिवशी बाजार समितीमध्ये दिली जात असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक देखील होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा श्रीरामपूर बाजार समितीच्या मोकळा कांदा मार्केटला विक्री करावा असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक दीपक नागरगोजे यांनी केले आहे.