स्मार्ट सिंचन प्रणालीचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकर्यांना उपयुक्त- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
राहुरी कृषी विद्यापीठात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
राहुरी विद्यापीठ : शेतीसाठी पाण्याचा वापर कार्यक्षम पध्दतीने केला पाहिजे. कास्ट प्रकल्पाने संशोधीत केलेले स्मार्ट सिंचन प्रणालीचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकर्यांनी आत्मसात करुन त्याद्वारे आधुनिक पध्दतीने शेती करावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, आय.ओ.टी. सक्षम सेन्सर आधारित अद्ययावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली (स्मार्ट सिंचन प्रकल्प), भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत असलेला राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व राष्ट्रीय कृषी विकास योजना-सिंचन पाणी गरज संल्ला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कास्ट प्रकल्पाचे सहसंशोधक डॉ. मुकुंद शिंदे व कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार म्हणाले की, सध्याच्या काळात शेतकर्यांना पाण्याबाबत वेगळा दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे झाली आहे. शेती समोरील विविध समस्यांबरोबरच पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर जास्तीत जास्त शेतकर्यांनी करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.
डॉ. दिलीप पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, येथून पुढे शेती जगवायची असेल तर सूक्ष्म सिंचनाशिवाय पर्याय नाही. काळ बदलला आहे. सध्या मोबाईलचा जमाना असून विद्यापीठाने तयार केलेली मोबाईल ॲप्स वापरून शेतकर्यांनी पाण्याचा कार्यक्षम वापर करावा. व्हाट्सअपच्या माध्यमातून ग्रुप करून हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी संशोधन सहयोगी डॉ. प्रज्ञा जाधव यांनी फुले इरिगेशन शेड्युलर मोबाईल ॲपची माहिती प्रात्यक्षिकासह उपस्थित शेतकर्यांना दिली. प्रक्षेत्रावरील ड्रोनचे प्रात्यक्षिक डॉ. गिरीषकुमार भणगे व इंजि. निळकंठ मोरे यांनी तर आय.ओ.टी. चे प्रात्यक्षिक इंजि. तेजश्री नवले व इंजि. विशाल पांडेय यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन व आभार डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राहुरी तालुक्यातील विविध गावातून आलेले महिला शेतकरी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.