अहिल्यानगर
उंदिरगाव येथे ११ दिवस अनोखी शिवजयंती
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : महाराष्ट्रभर वाजत गाजत शिवजयंती साजरी केली जाते. पण उंदिरगाव मधल्या शिवप्रेमींनी एक नवा पायंडा पाडत फक्त नाचूनच नाही तर वाचून शिवजयंती साजरी करण्याचा निश्चय केला आहे. सदर कार्यक्रम ८ ते १८ फेब्रुवारी दरम्यान रोज रात्री गावातील हनुमान मंदिरात सुरू आहे.
उंदिरगाव येथील नागरिकांचा व्हाट्सअप वर एक ग्रुप आहे. जो नेहमी समाजिक कार्य करत असतो. या ग्रुप चे नाव ‘ उंदिरगाव ग्रामस्थ ‘. याच ग्रुपवर तीन महिन्याअगोदर एका सदस्याने शिवजयंती नुसती नाचून न साजरी करता वाचून करावी असा विषय मांडला, सर्वांना तो पटला. गेली तीन महिने या विषयी बैठकी घेण्यात आल्या. ११ दिवस श्रीमान योगी पुस्तक वाचण्याचे ठरले. वाचायला बसणाऱ्यांची नाव नोंदणी झाली. पुस्तका करीता पैसे गोळा केले. पुण्यातील अप्पा बळवंत चौकात जाऊन पुस्तक खरेदी झाली. पुस्तक वाटले गेले. कार्यक्रमाची वेळ व ठिकाण ठरले. गावातील चौकात या कार्यक्रमाचे फ्लेक्स लावण्यात आले. कुठल्याही वर्गणी शिवाय कार्यक्रम करायचे असे आयोजकांनी पहिल्याच दिवशी जाहीर केले. फक्त वाचन करून शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्याचा मानस ठेवून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
या कार्यक्रमाने गावातील ग्रामस्थ इतके खुश झाले आहेत की, ते स्वतः होऊन या मुलांना रोज मंदिरात प्रसाद देत आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असे की, रात्री ७ ते ८.३० वाचन केले जाते. शेवटी मंदिरात आरती केली जाते. या आरतीला सर्व जाती धर्म पंथाचे १० ते १२ जोडपे रोज आरतीला उपस्थित असतात. उंदिरगाव येथे हनुमान मंदिर व मस्जिद जवळ जवळ आहे. उंदिरगाव हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रसिद्ध आहे. युवा पिढीने देखील ही बाब जपली आहे. वाचन सुरू असताना अजान साठी रोज वाचन बंद ठेवून शिवरायांनी दिलेली सर्वधर्म समभाव ची शिकवण तंतोतंत पाळली जाते.
संपूर्ण तालुक्यात अशा प्रकारे शिवजयंती साजरी करण्याचा हा पहिलाच उपक्रम. कार्यक्रमाचे फ्लेक्सचे फोटो व्हाट्सअप स्टेट्सवर ठेऊन तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. राज्यभरातून ‘उंदिरगाव ग्रामस्थ’ ला ईमेल, फोन, व्हाट्सअप द्वारे मेसेज करून त्यांचे कौतुक केले जात आहे.