अहिल्यानगर
राहुरी शहरात भर लोकवस्तीत उदमांजराची दहशत, सर्पमित्र पोपळघट व वनविभागाने पकडून निसर्गात केले मुक्त
राहुरी : शहरातील कासार गल्लीत राहात असलेले संजय रामचंद्र परदेशी यांच्या घरात सकाळी 7 वाजेच्या दरम्यान उदमांजर या वन्यजीवाने प्रवेश केला. परदेशी यांनी उदमांजराला बघताच मोठी भीती निर्माण झाली. बऱ्याच जणांनी हा प्राणी पहिल्यांदाच बघितल्याने भीतीचे प्रमाण वाढत गेले. त्याच वेळी तेथे उपस्थित असलेले सुजित पवार यांनी राहुरी शहरातील सर्पमित्र व वन्यजीव संरक्षक कृष्णा पोपळघट यांना फोन करून बोलावून घेतले.
कृष्णा पोपळघट यांनी स्वतः जाऊन बघितले असता ते उदमांजर असल्याचे नागरिकांना सांगितले. उदमांजर हा संरक्षित वन्यजीव असल्याने पोपळघट यांनी राहुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे यांना घटनेची माहिती दिली. पाचरणे यांनी ताबडतोब वन कर्मचारी ताराचंद गायकवाड यांना देखील घटनास्थळी पाठवले. काही वेळातच सर्पमित्र कृष्णा पोपळघट, ताराचंद गायकवाड व तौफिक शेख यांनी सदर उदमांजरास पकडले व निसर्गात मुक्त केले.
व्हिडिओ पहा : राहुरी शहरात भर लोकवस्तीत उदमांजराची दहशत, सर्पमित्र पोपळघट व वनविभागाने पकडून निसर्गात केले मुक्त…
उदमांजर हा मांसाहारी प्राणी असून अतिशय रागीट व हल्लेखोर स्वभावाचा असतो. त्याच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जखमी होण्याची शक्यता असते. तसेच राहुरी तालुक्यात कोठेही व कोणताही वन्यजीव मानवी वस्तीमध्ये आल्यास त्याला कोणतीही दुखापत न करता नागरिकांनी वनविभागाशी संपर्क करावा असे आवाहन कृष्णा पोपळघट यांनी केले. सदर घटनेच्या वेळी तेथे संतोष वरशिंदकर, सुजित पवार, अक्षय परदेशी आदी उपस्थित होते.