अहिल्यानगर
माजी सचिव के वाय बनकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
के वाय बनकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करतांना प्रभारी सचिव साहेबराव वाबळे, माजी सभापती नानासाहेब पवार, ज्येष्ठ नेते लाल पटेल, हिम्मतराव धुमाळ व उपस्थित कर्मचारी मान्यवर.( फोटो – संदिप आसने )
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव कोंडीराम यशवंत बनकर यांना श्रीरामपूर बाजार समितीचे प्र.सचिव, आजी माजी कर्मचारी, हमाल-मापाडी यांच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, ज्येष्ठ नेते लाल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्रीरामपूर बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्या हस्ते कोंडीराम बनकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी सचिव कोंडीराम बनकर यांनी बाजार समितीमध्ये 36 वर्ष यशस्वीरित्या सेवा पार पाडली. त्यांच्या काळामध्ये श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा खऱ्या अर्थाने विकास झाला असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी केले आहे.
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवपदाची धुरा अत्यंत समर्थपणे आपण पार पाडली. कायदा व व्यवहार यांची सांगड घालुन प्रभावीपणे कामकाज केले. त्यांचे काळात श्रीरामपूर व राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती एकत्रीत असतांना शासनाकडे अविरत पाठपुरावा करून लोणी येथे ११ एकर जमीन खरेदी केली. टाकळीभान व कोल्हार येथील उपबाजारासाठी अतिक्रमण काढून जमीन मिळविली. आपल्या दूरदर्शीपणामुळेच आपल्या बाजार समितीचा विकास होवू शकला. याचप्रमाणे आपल्या काळात शेतकरी निवास, वेअरहाऊस, बियाणे महामंडळ, जनावरांचा बाजार सुरू झाला. वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. आपल्या या योगदानामुळेच आज श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नावारुपास आणि प्रगतीपथावर आली असल्याचे प्रतिपादन प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी केले.
बाजार समितीमध्ये काम करत असताना सर्व कर्मचाऱ्यांनी बाजार समिती आपली समजून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन प्रामाणिकपणे काम करावे; असे केल्यास बाजार समितीची भरभराट निश्चितच होईल._ के.वाय.बनकर, माजी सचिव
टाकळीभान उपबाजारच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी के वाय बनकर यांनी मोलाची भूमिका घेत अतिशय धाडसाने अतिक्रमण काढून टाकळीभान उपबाजार आवार खुले केले तसेच बाजार समितीमध्ये काम करत असतानाच्या अनेक धाडसी कामगिरीच्या आठवणींना माजी सभापती नानासाहेब पवार यांनी उजाळा दिला. यावेळी बोलताना लाल पटेल यांनी बाजार समितीच्या निवडणूकीत पराभूत झाल्यानंतरही बाजार समिती संघावर काम करण्याची संधी केवळ के वाय बनकर यांच्यामुळेच मिळाली असल्याचे सांगत अनेक आठवणींना उजाळा दिला. माजी सचिव बोर्डे यांना नेवासा, खुलताबाद बाजार समितीवर सचिव म्हणून काम करण्याची संधी के वाय बनकर यांनी कशी उपलब्ध करून दिली याची उपस्थितांना माहिती देत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अर्चनाताई पानसरे,हिम्मतराव धुमाळ, राजेंद्र पानसरे, लिप्टे पाटील, भाऊसाहेब कांदळकर, माजी सचिव बोर्डे, व्ही आर सोनवणे, दिलीप भांड, विष्णू भांड, बी पी पवार, शंकरराव आसने, डी जे अकोलकर, कुंडलिक दळवी, दत्तात्रय जाधव, अजय कासार, हळनोर साहेब, अनिल पुंड, संजय सरोदे, माधुरी कांबळे, दिनकर पवार, वामन मोरगे, प्रल्हाद कल्याणकर, दत्तात्रय थोरात, पत्रकार देविदास देसाई, बापूसाहेब नवले, संदीप आसने सह श्रीरामपूर टाकळीभान बेलापूर येथील सर्व व्यापारी हमाल-मापाडी कर्मचारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्रीरामपूर बाजार समितीच्या वतीने करण्यात आले होते.