अहिल्यानगर
फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहणे हेच समाधान होय- प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता, कर्मं करीत राहिले पाहिजे, चांगल्या कामात प्रामाणिकपणे समर्पित राहण्यात आनंद आहे, अशी सत्कर्माची दखल आपली जवळची माणसे घेतात. हे सर्वात मोठे समाधान आहे, असे उदगार प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे यांनी काढले.
श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या स्वामी सहजानंद भारती शिक्षण शास्त्र महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे मित्रमंडळ व वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे गुणीजणांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव अनारसे होते. प्राचार्य शंकरराव गागरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी गुणीजणांचा गौरव परिचय करून देत सत्कार सूचना मांडली. प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळ व प्रा. डॉ. रामदास नान्नर यांची शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यास मंडळावर दोघांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. प्रा.डॉ. अमित गागरे यांची बालभारती अभ्यासक्रम मंडळावर निवड झाली. प्रा.डॉ.अनिल करवर यांना पीएचडी पदवी मिळाली, प्रा.डॉ. भागवत शिंदे यांनी संपादन केलेल्या महाविद्यालयीन ‘सहजानंद’ वार्षिकास सलग तीन वर्षांपासून पुरस्कार मिळाला, प्रा.चंद्रकात भोये यांना एम.फिल. पदवी मिळाली, प्रा.विजयराव पाटोळे यांची ‘महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली, किरण भाकरे यांची वरिष्ठ लिपिक पदावर निवड झाली, त्या गौरवप्रीत्यर्थ या गुणीजन मान्यवरांना शाल, बुके, पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. माजी प्राचार्य टी. ई.शेळके, प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी अशी निवड होणे ही प्रेरणादायी बाब असून सत्कारातून सत्कार्याला अधिक गती मिळते असे सांगितले.
प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे यांनी सांगितले की रयत संकुलांतर्फे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि रयत संकुलाच्या अध्यक्ष मीनाताई जगधने यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम आमच्या निवड झालेल्या सेवकवर्गाचा सत्कार झाला, ते समाधान मोठे आहे, त्यानंतर घरच्या रयतमधील शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ, ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्वांनी स्वतः पुढाकार घेऊन असा आशीर्वादरुपी केलेला सत्कार ही रयत प्रेमाची आणि विचारांची शिदोरी आहे. ती अधिक गोड आणि जीवनपोषक असल्याचे प्राचार्य डॉ. पोंधे यांनी सांगून सचिन तेंडुलकर यांचा प्रवास प्रसंग सांगितला. अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य शन्करराव अनारसे यांनी व्यासपीठावरील आणि सत्कारार्थी यांचे कष्टप्रद जीवन अनुभव सांगितले, विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवन वाचून, समजून घ्यावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर प्रा.डॉ.रामदास नान्नर यांनी आभार मानले.