पश्चिम महाराष्ट्र
नव्याने वीज दरवाढ लादल्यास उद्योजक आंदोलन करतील – बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा इशारा
बारामती : महावितरणने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे जवळपास ३७ % इतकी प्रचंड वीजदरवाढ करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मुळातच महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत वीजदर अधिक असून पुन्हा दरवाढ लादल्यास महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ लादल्यास महाराष्ट्रातील उद्योजक आंदोलन करतील असा इशारा बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिला आहे. वीज दरवाढीविरोधात महावितरण बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे निवेदन देण्यात आले.
यावेळी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सुर्यवंशी, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, मनोहर गावडे, अंबिरशाह शेख, संभाजी माने, उद्योजक विजय झांबरे, संदीप जगताप, अनिल काळे, शार्दुल सोनार, सुनील वैद्य, उज्वल शहा, सुनील पवार, हेमंत हेंद्रे, नितीन जामदार, सुजय पवार, विजय जाधव, सुशिल घाडगे, विनोद मोरे, रघुपती, रत्नाप्पा जैन आदी उद्योजक तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते उपस्थित होते.