अहिल्यानगर
राहुरी विद्यापीठातील कृषि एकता मंच अनाधिकृत, वाचनालय खुले करा – कडूस पाटील
राहुरी | अशोक मंडलिक : राहुरी कृषी विद्यापीठ येथे राज्यातील कृषि अभियंते यांच्या आंदोलनाला महेश कडूस पाटील यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. सुमारे एक हजार पदवीधर कृषि अभियंते गेले पंधरा दिवस आंदोलनात बसले आहेत. हे सरकार तसेच पदवीधर आमदारांना दिसत नाही का ? असा सवाल महेश कडूस पाटील यांनी आंदोलन व्यासपीठावर विचारला आहे. कृषि एकता मंच ही अनाधिकृत संघटना प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करीत असून कृषि एकता मंचा ने बळकावलेले वाचनालय विद्यापीठातील सर्व पदवीधरांना खुले करा अशी मागणी महेश कडूस पाटील यांनी व्यासपीठावर केली. तसेच कोणी यात कुलगुरूंना ओढणार असेल तर डॉ प्रशांत पाटील यांच्या मागे कृषि पदवीधर संघटना उभी राहील असे वक्तव्य महेश कडूस पाटील यांनी आज आंदोलन स्थळी केले आहे.
स्पर्धा परीक्षा आयोगात कृषि एकता मंच या चळवळीत असलेले लोक पदावर असल्याने हा दुजाभाव केला जात आहे, असा आरोप या वेळी कृषि पदवीधर संघटनेचे राहुरी शाखा प्रमुख योगेश गुंड यांनी केला आहे. पदवीधर अभियंते हे कृषि विभागात जी पदे भरली जातात त्या परिक्षा अभ्यासक्रमात त्यांच्या विषयाला कमी करून ते परिक्षा सुटणार च नाही अशी व्यवस्था आयोगाने केली आहे, हा अन्याय आहे आणि या वर जर निर्णय झाला नाही तर भविष्यात आंदोलनाचा इशारा योगेश गुंड यांनी दिला आहे. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे देखील कृषि पदवीधर संघटनेच्या वतीने योगेश गुंड यांनी पदवीधर अभियंते यांना आश्वासन दिले आहे.