उत्तर महाराष्ट्र
वन्यजीव संरक्षण संस्थेकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
धुळे : मकर संक्रांतीच्या पाश्वभूमीवर पिंपळनेर शहरात मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची खरेदी विक्री होत असते. नायलॉन मांजावर पूर्णपणे बंदी असून सुद्धा चोरट्या पध्दतीने ही खरेदी विक्री होत असते. नायलॉन मांजामुळे पक्षी, वन्यजीव व मनुष्याच्या जीवितास ही धोका निर्माण होतो म्हणून हायकोर्टाने नायलॉन मांजा खरेदी विक्री व संकलन करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
त्यामुळे पिंपळनेर शहरातील नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी वन्यजीव संरक्षण संस्थेकडून पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपाध्यक्ष दानिश पटेल, स्वप्नील चौधरी, तेजस काकुस्ते आदी उपस्थित होते.