ठळक बातम्या
देशभरात अन्यायकारक परिपत्रकाविरुद्ध EPS 95 पेंशन धारकांमध्ये असंतोष
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – 29 डिसेंबर 2022 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने जारी केलेल्या अन्यायकारक परिपत्रकाविरुद्ध 10 जानेवारी रोजी देशभरात असंतोष उफाळून आला. देशभरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयांसमोर सेवानिवृत्त पेन्शन धारकांनी सदरचे अन्यायकारक परिपत्रक जाळून आपला निषेध व्यक्त केला.
EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बॅनरखाली राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वात गेली 5 ते 6 वर्षांपासून आपले न्याय्य हक्कांसाठी EPS 95 पेंशनधारक लढा देत आहेत. EPS 95 पेन्शन धारकांच्या ज्या प्रमुख चार कलमी मागण्या आहेत त्यांमध्ये किमान पेन्शन रु.7500+DA, कोणताही भेदभाव न करता प्रत्यक्ष पगारावर जास्त पेन्शनची सुविधा, सर्व पेन्शनधारकांना (पती-पत्नी) वैद्यकीय सुविधा आणि ईपीएस योजनेत नसलेल्या निवृत्त कर्मचार्यांचा समावेश करणे ह्या आहेत. त्यासाठी तहसील स्तरापासून ते दिल्ली पर्यंत विविध प्रकारचे रस्त्यावरील आंदोलने करुन, सनदशीर मार्गाने लढा देऊन, सरपंच पासून ते पंतप्रधान यांचे पर्यंत निवेदने देऊन देखील आश्वासना व्यतिरिक्त फार काही या वृध्द पेंशन धारकांच्या पदरात पडले नाही.
देशाचे श्रम मंत्री एवढेच नाही तर आदरणीय पंतप्रधान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देखील समस्या कायमच असल्याने यातील पूर्ण पगारावर अंशदान देऊन उच्च पेंशन मिळावी म्हणून काही पेंशन धारक माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले. यात न्यायालयाने दिनांक 04 नोव्हेंबर 22 ला जो निकाल दिला त्याची अंमल बजावणीसाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 29 डिसेंबर 22 ला परिपत्रक काढले. मात्र हे या निकालाशी विसंगत असल्याने ज्या 10 /20 टक्के पेंशन धारकांना लाभ मिळणार होता त्यांना देखील तो मिळू नये असाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ते प्रसारित करण्यात आले असल्याचे वाटत आहे. याच्या निषेधार्थ नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयावर काळ्याफिती लावून, निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून व चुकीच्या परिपत्रकाचे दहन करीत मोर्चे काढण्यात आले.
किमान 7500 रु पेंशन व त्याला महागाई भत्ता मिळावा, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथे 1475 दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. दररोज जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्फत देशाचे पंतप्रधान यांचे नावे निवेदन दिले जाते. तरी देखील अजुन न्याय मिळाला नाही. आधीच 300 रु पासून 3500 रु पर्यंत पेंशन, त्यालाही महागाई भत्ता नाही, त्यामुळे हलाखीचे जीवन जगत असलेल्या या पेंशन धारकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला व त्यांनी कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 10 जानेवारी, 2023 ला संपूर्ण देशभर भविष्य निधी संंघटनेच्या या परिपत्रकाची होळी करून व काळी फित लावून निषेध व्यक्त केला. याचाच भाग म्हणून देशातील प्रत्येक भविष्य निर्वाह निधी कार्यालयांसमोर जिल्ह्यातील शेकडो ईपीएस पेंशनधारक एकत्र आले व त्यांनी द्वारसभा घेऊन या अन्याय कारक परिपत्रकाची होळी करून सरकारचा निषेध व्यक्त केला व आपले मागण्यांचे निवेदन राष्ट्रीय संघर्ष समितीचे चे शिष्ट मंडळाने ठिकठिकाणी भविष्य निर्वाह निधी ऑफिसचे प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केले व पेंशनर्सचा रोष, आक्रोश केंद्र सरकारकडे पोहचविण्याची आणि सामान्य पेंशनर्सच्या कामकाजासंबंधी कार्यालयात योग्य ते सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. त्याला योग्य प्रतिसाद देत ठिकठिकाणी ईपीएफओ ऑफिस प्रमुखांनी पेन्शन धारकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन आंदोलक शिष्ट मंडळाला दिले. आंदोलन सभेत संघतनेचे पदाधिक-यांनी ठिकठिकाणच्या आंदोलकांना मार्गदर्शन केले.
अहमदनगर येथे जिल्ह्यातील ४०० पेन्शन धारकांनी जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, उपाध्यक्ष सय्यद, शहराध्यक्ष संजय मुनोत, प्रकाश गायखे, बापूराव बहिरट, सुकदेव पाटील आहेर, हौसराज राजळे, भिमराज भिसे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करुन परिपत्रकाची होळी केली. नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयावर नासिक, नगर, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ५०० चे वर पेन्शनरांनी पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग जाधव यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले व विभागीय आयुक्त अनिलकुमार प्रितम यांना निवेदन देवून चर्चा केली. औरंगाबाद येथील आंदोलनामध्ये eps-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एस एन आंबेकर, उपाध्यक्ष डी. ए. लिपणे पाटील, कार्याध्यक्ष कमलाकर पांगरकर, महिला फ्रंटच्या जयश्री किवळेकर, मराठवाडा अध्यक्ष दादाराव देशमुख, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शशिकांत वडगावकर, कार्याध्यक्ष साहेबराव निकम इत्यादी हजारों पेन्शन धारकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
पुणे येथे भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश शिंदे, कार्याध्यक्ष चंद्रकांत राऊत, समन्वयक अजित घाडगे व असंख्य पेन्शनधारकांच्या उपस्थितीने आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड, पुणे येथे पिंपरी चिंचवड अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, महिला उपाध्यक्ष पूनम गुजर, उपाध्यक्ष तानाजी काळभोर, नगरसेविका शैलेजा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या संख्येने उपस्थितीत असलेल्या आंदोलकां समवेत निषेध व्यक्त करण्यात आला. कोल्हापूर येथे भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर उमेश कसबेकर, एस एन पाटील, अमर पाटील, आर डी पाटील, प्रकाश महाडिक, सुरेश मगदूम, बी एस किल्लेदार, दत्ता घोरपडे, चंद्रकांत ऐनापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. जळगाव येथे अध्यक्ष अरविंद भारंबे, उपाध्यक्ष रमेश नेमाडे, सचिव डी एन पाटील, कार्याध्यक्ष संजीव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो पेन्शन धारक उपस्थित होते. देशामधील या आंदोलनामध्ये ठिकठिकाणी हजारो आंदोलकांनी आपला सहभाग नोंदविला व तातडीने मागण्या पूर्ण न झाल्यास देशभर रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.