कृषी

भारतीय शेतीच्या शाश्वततेसाठी एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल फायदेशीर – उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी

राष्ट्रीय पातळीवरील एकात्मिक शेती पध्दतीच्या कार्यशाळेचा समारोप

राहुरी विद्यापीठ : एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलचा प्रसार लहान व मध्यम शेतकर्यांपर्यंत झाला पाहिजे. या कमी जमीन धारणक्षेत्र असणार्या शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना शाश्वत उत्पन्न मिळून ते आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल फायदेशीर असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. एस. के. चौधरी यांनी केले.
भारतीय एकात्मिक शेती संस्था, मोदीपुरम व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने एकात्मिक शेती या विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. चौधरी बोलत होते. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे मृदा व जलव्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. ए. वेलुमुरुगण, मोदी पुरम येथील भारतीय शेती पद्धती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. एस. पनवार, बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण संस्थेचे संचालक डॉ. सामी रेड्डी उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, मोदीपूरम येथील प्रकल्प समन्वयक डॉ. रवी शंकर, नाबार्डचे पुणे येथील जनरल मॅनेजर डॉ. प्रदिप पराते व एकात्मिक शेती पध्दतीचे प्रमुख कृषि विद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.
यावेळी डॉ. चौधरी पुढे म्हणाले की शेतीमधील रासायनिक खतांचा वापर 25 टक्क्यापेक्षा कमी करण्याचे भारत सरकारचे धोरण आहे. रासायनिक खतांचा वापर जितका कमी होईल तेवढे जमिनीचे आरोग्य चांगले राहिल. आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलो तरी जास्त उत्पादन घेण्यासाठी वारेमाप रासायनीक खतांचा वापर होत असतो. पर्यायाने जमिनीतील आवश्यक असणार्या जैविक घटकांचा र्हास होत आहे. आपली अन्नधान्याची गरज किती आहे याचा विचार व्हायला हवा. आपली शेती ही पर्यावरणाचा भाग असून पर्यावरणाची शाश्वतता टिकवायची असेल तर जमिनीचे आरोग्य जपावे लागेल असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. पनवार यांनी एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाबाबत माहिती दिली. डॉ. रवी शंकर यांनी या कार्यशाळेच्या चर्चासत्रामधील विविध पीक पध्दतीच्या अभ्यासानंतर मिळालेल्या शिफारंशीविषयी सादरीकरण केले. डॉ. सुनिल गोरंटीवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांनी एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडले आत्मसात केल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलमध्ये हरितगृहे, शेडनेट या घटकांचा अंतर्भाव केल्यास स्थानीक उद्योजकांना रोजगार मिळून ग्रामीण अर्थकारण सुधारण्याला पाठबळ मिळेल.
यावेळी डॉ. सामी रेड्डी व डॉ. वेलुमुरुगन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रदिप पराते यांनी एकात्मिक शेती पध्दतीविषयी नाबार्डच्या धोरणाविषयी माहिती दिली. या कार्यशाळेमध्ये विविध पीक पध्दती, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती या विषयावर बुध्दीमंथन करण्यात आले. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या पाच विविध श्रेणीतील उत्कृष्ट केंद्राना सन्मानपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मुख्ये केंद्राच्या श्रेणीतील प्रथम क्रमांक लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठ, उपकेंद्र श्रेणीतील द्वितीय क्रमांक आंध्रप्रदेशातील माटुटेरु येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राला मिळाले. संशोधन केंद्राच्या श्रेणीतील तिसरा क्रमांक पंजाब कृषि विद्यापीठाला मिळाला. अनुसुचित जाती गटातील चौथा क्रमांक कोइमतूर येथील तामिळनाडू कृषि विद्यापीठाला मिळाला आणि पाचवा क्रमांक गोवा येथील केंद्रिय कृषि संशोधन संस्थेला मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व सायली बिरादार यांनी तर आभार डॉ.ए.के. पृष्टी यांनी मानले. या द्विवार्षिक कार्यशाळेसाठी भारतातील 25 राज्य/केंद्रशासीत प्रदेशातून 160 शास्त्रज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे व डॉ. गोरक्ष ससाणे, विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button