अहिल्यानगर
सत्कार्याच्या कार्याचा सत्कार होतो तेव्हा सेवेला बळ मिळते- प्राचार्य टी.ई.शेळके
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – जेव्हा व्यक्ती निरपेक्षपणे सत्कार्य करते आणि तितक्याच निरपेक्ष भावनेने या सत्कार्याचा सन्मान होतो तेव्हा माणुसकी प्रगटते, सत्कार्याच्या कार्याचा सत्कार होतो तेव्हा सेवेला बळ मिळते, असे मत ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे आणि मित्रपरिवार यांनी महामानव डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवनात जाऊन डॉ. विकास आमटे यांच्या शुभहस्ते स्वरानंदवन प्रकल्प प्रमुख, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त तथा दिव्यांगाचे प्रेरणास्रोत सदाशिवराव ताजने यांना सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके, देणगी स्वरूप चेक,मानपत्र देऊन सत्कार केला आणि श्रीरामपूर पॅटर्न आठवणी विशद केल्या, हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सौ. मंदाकिनी आमटे कुटुंबीय यांचाही सन्मान केला. सोमनाथ प्रकल्प, लोकबिरादरी यांची पाहणी करून आलेले सुकळे सर यांचा सत्कार प्राचार्य शेळके यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ बाबुराव उपाध्ये, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानतर्फे प्रा.शिवाजीराव बारगळ, इंदिरानगर ग्रुपतर्फे माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनीही सुखदेव सुकळे, सौ. सुरेखा बुरकुले, सुयोग बुरकुले यांचा सत्कार करण्यात आला. सुखदेव सुकळे यांनी आनंदवन, सोमनाथ प्रकल्प, हेमलकसा आणि स्व. महामानव डॉ. बाबा आमटे, स्व.साधनाताई आमटे, स्व.ॲड, रावसाहेब शिंदे यांचे सेवाभावी कार्य, श्रीरामपूर सेवा पॅटर्न आठवणी सांगितल्या. प्राचार्य शेळके यांनी आनंदवन म्हणजे माणुसकीची कार्यशाळा असून हे सेवेचे तीर्थ पाहवे असे आवाहन केले. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी महामानव डॉ. बाबा आमटे यांच्या श्रीरामपूर भेटीचे अनेक अनुभव सांगून त्यांचे सेवाकार्य नव्या पिढीला प्रेरणादायी आहेे. त्यांनी लिहिलेले ‘उज्ज्वल उद्यासाठी ‘, ‘ज्वाला आणि फुले ‘ ही पुस्तके वाचावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे, प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. डॉ. बाळासाहेब बढे यांची सुकन्या श्वेताली बढे यांनी सी. ए.परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्राचार्य शेळके यांनी सी. ए. होणे ही अभिमानास्पद कॊतुकास्पद आहे असे सांगून बढे परिवाराचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन डॉ. उपाध्ये यांनी केले. सुखदेव सुकळे यांनी आभार मानले.